डाक कर्मचाऱ्यांचा संप, तरी काम सुरूच
By admin | Published: March 18, 2015 11:38 PM2015-03-18T23:38:20+5:302015-03-18T23:55:40+5:30
निम्मे कर्मचारी कामावर : २० हजार पत्रे टपाल कार्यालयात पडून
कोल्हापूर : ग्रामीण डाकसेवकांच्या काही प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून देशव्यापी बेमुदत संप सुरू आहे. जिल्ह्यातील ४०६ ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संपात असल्याने ३० टक्के डाक यंत्रणेवर परिणाम झाल्याचे कोल्हापूर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक रमेश पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण ४६५ टपाल कार्यालये आहेत. यामध्ये ८७८ ग्रामीण डाकसेवक कार्यरत आहेत. संपामध्ये ४०६ कर्मचारी सहभागी झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील टपाल व्यवस्थेवर ३० टक्के परिणाम झाला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. सध्या डाक विभागातील फक्त ५० टक्केच कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जे कर्मचारी सहभागी नाहीत, त्यांच्याकडून उर्वरित कामे करून घेण्यात येत आहेत. ( प्रतिनिधी )
संपामुळे सुमारे २० हजार पत्रे टपाल कार्यालयात पडून आहेत. संपाला जिल्ह्यातून सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पत्रे, रजिस्टर, पार्सल, दाखले पडून राहिल्याने साधारण एक कोटीच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत बंद मागे घेणार नाही.
- चंद्रकांत बुडके, सचिव, ग्रामीण डाकसेवक संघ
उलाढाल धिम्या गतीने
जिल्ह्यामध्ये एकूण ४६५ टपाल कार्यालये आहेत. या कार्यालयांत टेलिफोन बिल, रजिस्टर, मनीआॅर्डर, पोस्ट विमा खाते, परीक्षा फॉर्म, बचत खात्यासह वीज बिले भरली जातात. नऊ दिवसांपासून कर्मचारी संपावर असल्याने लाखोंची उलाढाल धिम्या गतीने होत आहे.