‘मुघल-ए-आजम’च्या पोस्टरचे वारसदार उपेक्षित

By admin | Published: September 21, 2014 01:15 AM2014-09-21T01:15:24+5:302014-09-21T01:24:20+5:30

शाहरूखकडून अपेक्षा : लिलावात दुसऱ्यानेच केली कमाई; जी. कलायोगी यांच्या मुलांची दैन्यावस्था

The poster of 'Mughal-e-Azam' poster neglected | ‘मुघल-ए-आजम’च्या पोस्टरचे वारसदार उपेक्षित

‘मुघल-ए-आजम’च्या पोस्टरचे वारसदार उपेक्षित

Next

संदीप आडनाईक ल्ल कोल्हापूर
ओशिएन्स ग्रुपने आयोजित केलेल्या लिलावात अभिनेता शाहरुख खान याने ‘मुघल-ए-आजम’ या अतिभव्य चित्रपटाच्या मूळ पोस्टरच्या कलाकृती सहा लाख ८४ हजार रुपयांना विकत घेतल्या. मात्र, मुघल-ए-आजमचे मूळ पोस्टर ज्यांनी तयार केले त्या जी. कलायोगी या कलाकाराच्या वारसदारांच्या हाती मात्र काही लागलेले नाही.
१९६0मध्ये प्रदर्शित झालेला के. असिफ दिग्दर्शित ‘मुघल-ए-आजम’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने अनेक नवे पायंडे हिंदी चित्रपटसृष्टीत पाडले. १९६0 मध्ये आलेला हा चित्रपट चालेल की नाही, या भीतीपोटी निर्माता शापुरजी पालोनजी यांनी लंडनहून या चित्रपटाच्या १५0 प्रिंटस् मागवून त्या एकाच दिवशी देशभर प्रदर्शित केल्या.
‘मुघल-ए-आजम’ या चित्रपटाच्या पोस्टरसाठी मुंबईतील अनेक कलाकारांची चित्रे के. असिफ यांनी पाहिली; पण त्यांना ती पसंत पडली नाहीत. म्हणून रोमच्या कलाकारांना त्यांनी निमंत्रण दिले होते. तेव्हा मुंबईतील कलाकारांनी हे मोठे काम भारतातून जाऊ नये म्हणून कोल्हापुरातील चित्रकारांकडे धाव घेतली. जी. कलायोगी हे तेव्हा व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांसाठी पोस्टर्स बनवित असत. त्यामुळे जी. कलायोगी यांचे मुंबईतील शिष्य अंकुश यांनी या पोस्टर्ससाठी जी. कलायोगी यांना साकडे घातले. जी. कलायोगी तेव्हा व्ही. शांताराम यांच्या एका चित्रपटाचे पोस्टर्स करण्यात गुंतले होते. तरीही त्यांनी के. असिफ यांच्या मनातील मुघल-ए-आजम चित्रपटासाठी एक स्केच तयार करून तो मुंबईला मोहन स्टुडिओत पाठविले. के. असिफ यांनी हे स्केच त्यांच्या सवडीने पाहिले आणि तत्काळ त्यांनी जी. कलायोगी यांचा शोध घेतला. तेव्हा कोल्हापुरातील उमा टॉकीजचे मालक नाना इंगळे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. इंगळे यांनी लगेचच जी. कलायोगी यांना बोलावून घेतले. के. असिफ यांनी फोननवरून त्यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. कलायोगी यांनी दुसऱ्याच दिवशी मुंबई गाठली. त्यांच्यासोबत त्यांचे दोघे मित्र आणि नातेवाईक यशवंतराव घोटणे होते.
वांद्रे येथील दिलीपकुमार यांच्या बंगल्यावर के. असिफ आणि जी. कलायोगी यांची भेट झाली. त्यांनी दुसऱ्या दिवशी अकरा वाजता अंधेरीच्या त्यांच्या स्टुडिओत भेटायला बोलावले. दुसऱ्या दिवशी जी. कलायोगी स्टुडिओत गेले. त्यांनी आणखी काही स्केच काढून दाखविले. ते के. असिफ यांना पसंत पडताच त्यांनी कलायोगी यांना मुंबईतच राहायला बोलावले. त्यानंतर जवळजवळ अडीच वर्षे जी. कलायोगी मुंबईतल्या स्टुडिओच्या आवारातच राहत होते. त्यांच्यासाठी के. असिफ यांनी स्वतंत्र सोवळेकरीही नेमला होता.
जी. कलायोगी यांच्यासोबत त्यांचे कुटुंंबही तेथे राहायला गेले. कलायोगी यांनी मुघल-ए-आजमची असंख्य पोस्टर्स तयार केली. या चित्रपटाचा भव्य प्रीमिअर शो मराठा मंदिरात झाला. मराठा मंदिरचाही तो पहिलाच चित्रपट होता. के. असिफ यांनी मराठा मंदिर थिएटरवर दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्या प्रेमदृश्याचे भव्य पोस्टर लावले होते. या पोस्टरशिवाय पाच तोळे सोन्यांचा मुलामा दिलेले १५ फुटी पितळेच्या थाळीवर चितारलेले पोस्टरही लोक रांगा लावून पाहत असत.
मुंबईत टॅ्रफिक जॅम
भव्य पोस्टर्स पाहूनच अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी रांग लागली होती. लोक स्वयंपाकाची भांडी आणि स्टोव्ह घेऊनच रांगेत थांबत होते. पोस्टर पाहण्यासाठी इतकी गर्दी व्हायची की, मुंबई सेंट्रलची वाहतूक जाम व्हायची, अशी माहिती कलायोगी यांचे चिरंजीव अशोक कांबळे सांगतात. राणी एलिझाबेथ यांच्या भारत दौऱ्यात त्यांना दिल्लीत मुघल-ए-आजमचे पोस्टर दिसले. त्यांनी हा चित्रपट पाहण्याचा आग्रह जवाहरलाल नेहरू यांच्याकडे धरल्याची आठवण कांबळे यांनी सांगितली. नेहरू यांनी हा चित्रपट तेव्हा जयपूर येथे राणी एलिझाबेथ यांना दाखविला.
अशा या कलाकाराला ‘मुघल-ए-आजम’ चित्रपटाच्या पोस्टरसाठी ठरलेली रक्कम मिळाली नव्हती, हे दुर्देव. के. असिफ यांनी प्रयत्न करूनही शापुरजी पालोनजी यांनी ही रक्कम दिली नाही. स्वत: के. असिफ यांनाही ठरलेली रक्कम मिळाली नव्हती. मात्र, आज याच पोस्टरसाठी एका लिलावात सहा लाखांहून अधिक रक्कम मिळते; पण ती त्यांच्या मूळ कलाकाराच्या वारसांना मिळत नाही.
मुळात नेविन टुली या चित्रसंग्राहकाने जी. कलायोगी यांच्याकडूनच या मूळ पोस्टसर््चे छायाचित्र नेले होते. ते छायाचित्र कोल्हापुरातील जी. कलायोगी यांचे शिष्य रियाज शेख यांनीच टुली यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्याबद्दल अवघे पाचशे रुपये टुली यांनी शेख यांच्या हातावर टेकविले होते.
यानंतर जेव्हा मुघल-ए-आजम चित्रपट के. असिफ यांचे चिरंजीव अकबर यांनी रंगीत केला, तेव्हा झाडून सारे कलाकार मुंबईत आले होते. तेव्हाही जी. कलायोगी यांच्याच मुघल-ए-आजमच्या मूळ पोस्टरवर टुली यांनी दिलीपकुमार आणि शाहरुख खान यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि प्रसिद्धी मिळविली होती.

Web Title: The poster of 'Mughal-e-Azam' poster neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.