वडगावात सुट्टीदिवशी वाटल्या पोस्टमननी राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:10+5:302021-08-23T04:27:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क/सुहास जाधव पेठवडगाव : सध्याचे युग हे जलद संपर्काचे डिजिटल युग आहे. मात्र, या काळातदेखील काही ...
लोकमत न्यूज नेटवर्क/सुहास जाधव
पेठवडगाव : सध्याचे युग हे जलद संपर्काचे डिजिटल युग आहे. मात्र, या काळातदेखील काही गोष्टी या आभासी जगापेक्षा महत्त्वाच्या असतात. अशी गोष्ट म्हणजे बहिणीने पाठवलेली राखी. आभासी जगातील संवादापेक्षा ही राखी आजची मानकरी आणि म्हणूनच बहीण-भावाच्या नात्यातील गोडवा जपण्यासाठी चक्क सुट्टीदिवशी पेठ वडगावातील तीन पोस्टमन बांधवांनी घरोघरी राखीची टपाल पोहोचवली.
सध्या सोशल मीडियामुळे नातेवाईक एका क्लिकवर आले आहेत. क्षणात संपर्क साधून एकमेकांशी संभाषण, संवादाची देवाणघेवाण सहज शक्य झाली आहे. मात्र, बहिणीने पाठविलेल्या एका धाग्याला रक्षाबंधनादिवशी जे महत्त्व असते त्याची जागा अजूनही कोणी घेतलेली नाही. धावपळीच्या युगात तर नात्यातील ओलावा रक्षाबंधनच्या निमित्ताने जपला जातो. पारंपरिकरीत्या पोस्टातून हजारो मैलांवरून बहीण आपल्या भावाला राखी पाठवतात, पण नेमका आज रविवार आल्यामुळे बहिणीचे हे बंधन भावापर्यंत पोहोचविण्याचे काम पोस्ट खात्यासमोर आव्हानाचे होते. सुट्टीची पर्वा न करता वडगावातील पोस्टमन श्रीकांत कुलकर्णी, विजयसिंह धुंदरे, देवधान वाघमारे यांनी बहीण-भावांच्या नात्यातील ओलावा जपण्यासाठी शहरात रविवारी पोस्टातून आलेल्या राखीच्या टपालांचे वाटप केले. त्यामुळे अनेक भावांना दुहेरी प्रेम ओलावा दिसून आला. पोस्टमन बांधवांच्या या आपुलकीबद्दल सत्कार करून काही नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.