पोस्टमॉर्टेम केले महिलेचे, अहवाल दिला पुरुषाचा!; कोल्हापुरातील सीपीआरचा अजब कारभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:50 IST2025-02-11T11:49:54+5:302025-02-11T11:50:41+5:30
प्रशासनाच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह

पोस्टमॉर्टेम केले महिलेचे, अहवाल दिला पुरुषाचा!; कोल्हापुरातील सीपीआरचा अजब कारभार
कोल्हापूर : गळतगा (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथे दुचाकीच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सीपीआरने शवविच्छेदन अहवालात महिलेच्या ऐवजी पुरुषाचा उल्लेख केला. या प्रकारामुळे नातेवाईक आणि सदलगा (ता. निपाणी) पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पुन्हा सीपीआरमध्ये चकरा माराव्या लागल्या. सीपीआरचा अजब कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याने प्रशासनाच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गळतगा येथील मंगल बाळकृष्ण मोरे (वय ६८) या शेतात जाताना दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्या होत्या. मंगळवारी (दि. ४) अपघात झाल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. ७) त्यांचा मृत्यू झाला. अपघाती मृत्यू असल्याने सीपीआर पोलिस चौकीने याची माहिती सदलगा पोलिसांना दिली. सीपीआर प्रशासनाने मंगल यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करून नातेवाइकांना अहवाल दिला.
नातेवाईक घाईगडबडीत अहवाल घेऊन घरी गेले. सदलगा पोलिस ठाण्यात अहवाल सादर केल्यानंतर त्यावर मृत मंगल यांचा पुरुष असा उल्लेख असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी नातेवाइकांना बोलवून घेऊन चुकीची दुरुस्ती करून आणण्यास सांगितले. त्यानंतर सदलगा पोलिस ठाण्यातील एक अंमलदार आणि मोरे यांच्या नातेवाइकांनी सोमवारी सीपीआरमध्ये येऊन शवविच्छेदन अहवाल दुरुस्तीची मागणी केली. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल रुग्णाचे नातेवाईक आणि कर्नाटक पोलिसांनी नाराजी व्यक्त केली.
आधी चुका, नंतर दुरुस्ती
सीपीआरमधील अनेक कर्मचारी कामकाजात गंभीर चुका करतात. शवविच्छेदन अहवाल, मृत्यू दाखल्यांमध्ये अनेकदा चुका आढळतात. पुन्हा त्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना वेळ घालवावा लागतो. वरिष्ठ अधिका-यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे.