तांत्रिक कारणामुळे समीरची सुनावणी पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2015 01:00 AM2015-12-19T01:00:16+5:302015-12-19T01:17:30+5:30
पानसरे हत्या प्रकरण : पोलिसांवरील आरोप फेटाळले
ेकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन प्रभात संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील तांत्रिक कारणामुळे शुक्रवारी झाली नाही. ती आता ३० डिसेंबरला होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. दरम्यान, समीरने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व पत्राद्वारे पोलिसांवर न्यायालयात केलेले आरोप प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयाने निकाली काढत, हे आरोप बनावट असल्याचे स्पष्ट केले.
गोविंद पानसरे हत्येप्रकरणी १४ डिसेंबरला आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात समीर गायकवाडवर दोषारोपपत्र दाखल झाले. याप्रकरणी त्याला म्हणणे मांडण्यासाठी शुक्रवारची तारीख कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला पत्राद्वारे दिली होती. त्यानुसार समीर हजर होणार होता; परंतु पोलीस बंदोबस्ताच्या कारणामुळे, तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्ही.सी.)द्वारे न्यायाधीशांबरोबर समीरचा संवाद साधण्याचा निर्णय झाला. यासाठी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी न्यायमूर्ती आर. डी. डांगे आले; पण १५ ते २० मिनिटे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
डांगे यांनी, समीर गायकवाडची सुनावणी ही ३० डिसेंबरला होईल, असे समीरचे वकील अॅड. एस. व्ही. पटवर्धन, अॅड. एम. एम. सुवासे, अॅड. संदीप आपशिंगेकर व अॅड. आनंद देशपांडे, आदींसह सहायक सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांना सांगितले. त्यानंतर डांगे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षातून बाहेर पडले. यावेळी अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे, गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा, दिलीप पवार, उदय नारकर, आदी उपस्थित होते.
दरम्यान, समीर गायकवाडने २१ आॅक्टोबर २०१५ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ‘तुला २५ लाख रुपये देतो, आम्ही सांगतो ती नावे घे’ असा आरोप करून पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती. यानंतर २५ आॅक्टोबरला मंडल अधिकारी यांनी कळंबा कारागृहाचे तुरुंगाधिकारी यांना याबाबत तक्रार केल्याचे पत्र पाठविले.
तुरुंगाधिकारी यांनी हे पत्र न्यायालयाला पाठविले. न्यायालयाने या पत्राची दखल घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांनी याचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीमधील समीरने केलेल्या तक्रारीसंदर्भात फुटेज पाहून न्यायालयाला अहवाल सादर केला. त्याचा अभ्यास करून न्यायमूर्तींनी ही तक्रार निकाली काढली. समीरने ही तक्रार त्या दिवशी केली असल्यामुळे ती बनावट असल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.
समीर बोललाच नाही...
समीर गायकवाडने व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये व पत्राद्वारे पोलिसांवर आरोप केले होते. ते म्हणजे कळंबा कारागृहातून न्यायालयाकडे जात असताना ‘एका पोलिसाने माझ्या कानात, तुला २५ लाख रुपये देतो. तुला आम्ही चारजणांची नावे सांगतो, ती तू घे,’ असे सांगितल्याचा गौप्यस्फोट केला होता. याचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार तपास अधिकाऱ्यांनी तपास केला असता त्यामध्ये ‘ज्या-ज्या दिवशी समीरला न्यायालयात बंदोबस्तात पोलिसांनी आणले, तेव्हा त्याच्याबरोबर कोणताही पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी बोलला नसल्याचे एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या फुटेजवरून तपास अधिकारी यांना दिसून आले. यावरून समीर कोणाशीही बोलला नसल्याचे स्पष्ट होत आहे.