विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
By admin | Published: October 6, 2016 12:56 AM2016-10-06T00:56:47+5:302016-10-06T01:08:49+5:30
सुधारित वेळापत्रक वेबसाईटवर : आता २४ आॅक्टोबरपासून होणार परीक्षा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील पहिल्या सत्रामधील लेखी परीक्षा १४ आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या; मात्र मराठा क्रांती मोर्चा, एसआरपीडी प्रणाली, बारावी अभ्यासक्रमातील पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी या कारणांस्तव १४ आॅक्टोबरपासून होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षा २४ आॅक्टोबरपासून होणार आहे. १७ अभ्यासक्रमांच्या परीक्षा असून, यांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी दिली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा १४ आॅक्टोबर रोजी सुरू होत आहेत. काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एसआरपीडी कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे. याबाबत कोल्हापूर, सांगली व सातारा येथे कार्यशाळा घेण्यात आली आहे. यावेळी काही प्राचार्यांनी ‘एसआरपीडी’साठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगितले. तसेच शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये बारावी अभ्यासक्रमाच्या पुरवणी परीक्षांमुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दि. ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत पदवी महाविद्यालयात प्रवेश देण्यात आलेला आहे; तर काही महाविद्यालयांत शासनाकडून मंजूर नवीन अभ्यासक्रमासाठी प्राथमिक संलग्नीकरण सप्टेंबर २०१६ मध्ये झाले आहे. त्यामुळे प्रवेश व परीक्षा अर्ज भरून घेण्यास अधिकचा कालावधी लागणार आहे. यासाठी महाविद्यालये व विद्यापीठ पदव्युत्तर अधिविभागामधून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यासह १५ आॅक्टोबर रोजी मराठा मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी मोर्चाच्या नियोजनात कार्यरत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली होती. (प्रतिनिधी)