corona virus-राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या परीक्षा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 04:48 PM2020-03-17T16:48:28+5:302020-03-17T16:51:16+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. सीबीएसई अभ्यासक्रमांच्या शाळांनी त्यांच्या दोन-तीन विषयांच्या राहिलेल्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. सीबीएसई अभ्यासक्रमांच्या शाळांनी त्यांच्या दोन-तीन विषयांच्या राहिलेल्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रम असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या परीक्षा दि. २० ते २२ मार्च दरम्यान सुरु होणार होत्या. मात्र, कोरोनामुळे दक्षता म्हणून या शाळांनी परीक्षा स्थगित करण्याचा सोमवारी निर्णय घेतला आहे.
सीबीएसई माध्यमाच्या काही शाळांतील परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाल्या आहेत. दोन ते तीन विषयांच्या परीक्षा उरल्या आहेत. त्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या शाळांमध्ये सहामाही परीक्षा, अन्य चाचणी परीक्षांमधील गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना वार्षिक गुणदान करण्याचा पर्याय स्वीकारण्यात येणार आहे.
सीबीएसईच्या बहुतांश शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात दि. १ एप्रिलपासून होते. त्यामुळे त्यांनी परीक्षेबाबत संबंधित निर्णय घेतला असल्याची माहिती ‘ईसा’चे प्रदेशाअध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी दिली.