मराठा बँक शेअर्स ठेवीदारांचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:04 PM2019-03-01T13:04:15+5:302019-03-01T13:17:26+5:30
मराठा बँकेच्या ४८ हजार सभासदांच्या शेअर्स ठेवी परत मिळाव्यात यासाठी मराठा संघटनेतर्फे गुरुवारी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सारस्वत बँकेने ६ मार्चपर्यंत सहकार आयुक्तांच्या निर्णयापर्यंत आंदोलन करू नये, अशी विनंती केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
कोल्हापूर : मराठा बँकेच्या ४८ हजार सभासदांच्या शेअर्स ठेवी परत मिळाव्यात यासाठी मराठा संघटनेतर्फे गुरुवारी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सारस्वत बँकेने ६ मार्चपर्यंत सहकार आयुक्तांच्या निर्णयापर्यंत आंदोलन करू नये, अशी विनंती केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
कोल्हापूर मराठा बँकेचे सारस्वत बँकेत ६ मार्च २००९ रोजी विलीनीकरण झाले. विलीनीकरणाच्या आदेशानुसार शेअर्स ठेवी सभासदांना परत मिळाल्या नाहीत. मात्र, याच पद्धतीने कोल्हापूर जनता बँक, शाहू बँक, आदी बँकांचे विलीनीकरण झाल्यानंतर त्या-त्या सभासदांना ठेवी परत देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मराठा बँकेच्या सभासदांना या ठेवी मिळणे गरजेचे होते; पण सारस्वत बँकेने दहा वर्षे झाली तरी या ठेवी परत दिल्या नाहीत. म्हणून मराठा संघटनेतर्फे गेल्या काही वर्षांपासून शेअर्स ठेवीचे पैसे परत मिळावेत. याकरिता आंदोलन केले जात आहे.
यातीलच एक भाग म्हणून गुरुवारी संघटनेतर्फे उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सारस्वत बँकेतर्फे कार्यकारी संचालिका स्मिता संधाने यांनी ६ मार्च २०१९ ला अनुत्पादित कर्जाची वसुली व त्यावरील झालेला बँकेचा खर्च हा आॅडिट करून घेतला जाईल.
तो ताळेबंद सहकार आयुक्तांकडे पाठविला जाईल. त्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल. तरी सहकार आयुक्तांचा निर्णय होईपर्यंत आंदोलन करू नये, अशी सारस्वत बँक प्रशासनातर्फे विनंती केली. त्यानुसार संघटनेतर्फे तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
६ मार्चनंतर निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. यावेळी बाळ घाटगे, नितीन शेळके, राजू सावंत, विजय पाटील, सदानंद सुर्वे, प्रमोद पाटील, नारायण मोरे, धैर्यशील जगताप, नारायण मोरे, संजय पाटोळे, रणजित भोसले, आदी उपस्थित होते.