राज्यातील राष्ट्रीय पेयजल योजनांना स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:14 PM2019-11-23T12:14:18+5:302019-11-23T12:15:43+5:30
सध्याच्या राष्ट्रीय पेयजल योजना या पुढील १५ वर्षांच्या वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून आखली जाते. मात्र ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून पुढील वर्र्षापासून होणाºया योजना ३० वर्षे वाढणारी लोकसंख्या विचारात करून आखल्या जाणार आहेत.
समीर देशपांडे
कोल्हापूर : केंद्र शासन लवकरच नव्या ‘जलजीवन मिशन’ची घोषणा करणार असून, त्यामुळेच सध्या राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याबाबत तोंडी सूचना देण्यात आल्या असून, याबाबत लवकरच लेखी आदेशही काढण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल योजनांच्या माध्यमातून गावागावांना पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. मात्र केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सरकार आल्यानंतर पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाकांक्षी अशा ‘जलजीवन मिशन’ची घोषणा करण्यात येणार आहे.
प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा, सध्या रोज प्रतिमाणसी ४० लिटर पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून, ते वाढवून आता रोज प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्याच्या राष्ट्रीय पेयजल योजना या पुढील १५ वर्षांच्या वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून आखली जाते. मात्र ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून पुढील वर्र्षापासून होणाºया योजना ३० वर्षे वाढणारी लोकसंख्या विचारात करून आखल्या जाणार आहेत.
केंद्र शासनाकडून नव्या ‘मिशन’च्या अंमलबजावणीची वेगाने कार्यवाही सुरू असल्यामुळे सध्या कार्यारंभ आदेश दिलेल्या योजना वगळून सर्व योजनांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ज्या राष्ट्रीय पेयजल योजनांना कार्यारंभ आदेश मिळाले आहेत. त्याच योजनांची कामे सुरू राहणार असून, प्रशासकीय मान्यता मिळालेल्या योजनांचे कामही थांबविण्यात येणार आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यात ११० योजनांचे काम थांबणार
कोल्हापूर जिल्ह्यात १६० राष्ट्रीय पेयजल योजनांना तांत्रिक सहमती देण्यात आली होती. त्यांपैकी ८७ योजनांना प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली होती. त्यांपैकी ५० कामे सुरू करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. या ५० योजना वगळता उर्वरित ११० योजनांचे काम सध्या तरी आहे त्या स्तरावर थांबविण्यात आले आहे.