सेवामार्गावर खड्डेच खड्डे, मोडतेय कंबरडे; पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 11:53 AM2023-07-28T11:53:12+5:302023-07-28T11:59:56+5:30
शिये फाटा, शिरोली, टोप येथील धोकादायक चित्र : वाहनधारकांतून संताप
सतीश पाटील
शिरोली : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सहापदरी होत आहे, यासाठी जवळपास ४,५०० कोटींचा निधी खर्च होत आहे; पण सेवामार्गांचे काय, सेवामार्गावर दीड- दोन फूट खोल खड्डे पडले असून, ते पाण्याने भरलेले आहेत. यामुळे सेवामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. शिये, पुलाची शिरोली, टोप येथील हे धोकादायक चित्र असून, याकडे राष्ट्रीय महामार्गाकडे ठेकेदाराने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. वाहनधारकांतून याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाने कागल ते सातारा सहापदरीकरण रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू केले आहे; पण या रस्त्यालगत दोन्ही बाजूंना स्थानिक वाहतुकीसाठी सेवामार्ग आहेत. या सेवामार्गांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. शिये फाटा, एमआयडीसी पहिला फाटा, मयूर फाटा, शिरोली फाटा, गोकुळ शिरगाव, अशा बऱ्याच ठिकाणी सेवामार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे उन्हाळ्यातच पडले असून, ठेकेदाराने हे दुरुस्ती करणे गरजेचे होते; पण ते साधा मुरूम टाकूनसुद्धा भरले नाहीत. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर हेच खड्डे पाण्याने भरले असून, त्यांना डबक्याचे स्वरूप आले आहे. या खड्ड्यांतून वाहनधारकांना प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
शिरोली एमआयडीसी येथे येणारे कामगार, स्थानिक लोक, शेतकरी या सेवामार्गाचा वापर करतात. या खड्ड्यांमुळे दररोज किरकोळ अपघात घडत आहेत, तर दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे. सेवा रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे तात्काळ भरावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
सेवामार्गावर खड्डे पडलेले ठिकाण
शिये फाटा : महामार्गाला लागून असणारा शिये फाटा सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. शिये फाटा पश्चिम बाजूस सेवामार्गाची चाळण झाली आहे. कोल्हापूर, शिये, भुये, निगवे, वडणगेसह इतर ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. याठिकाणी नेहमी वाहतुकीची वर्दळ असते. एमआयडीसीतील कामगारांना रात्रीचा प्रवास जीव मुठीत घेऊनच करावा लागतो.
एमआयडीसी पहिला फाटा : याठिकाणी भुयारी मार्गासमोर रस्त्यात मधोमध दोन फूट खड्डा पडला आहे. औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी हा महत्त्वाच्या रस्ता आहे.
शिरोली फाटा : भुयारीमार्गाच्या खाली खड्डे पडल्याने या भुयारीमार्गाला तळ्याचे रूप आले आहे. यामुळे दुर्गंधी सुटली आहे. ड्रेनेज आणि खड्डे एकच झाले आहेत.
टोप कासारवाडी : टोप येथील भुयारीमार्गात तर संपूर्ण खड्डे पडले आहेत. यातून वडगाव, आष्टा आदी ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. यातून तर जाताच येत नाही.
जीव गेल्यावर खड्डे भरणार?
शिये फाट्यावरील सेवामार्गावरून महामार्गावर जाताना रस्त्यावर पडलेले खड्डे गेल्या महिन्यापासून ‘जैसे थे’ आहेत. दिवसभर या रस्त्यावर मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. रात्रीच्या वेळी तर रस्त्यावर अंधार आणि खड्डे, तसेच पावसाचे पाणी असल्यामुळे रस्त्याचा काहीही अंदाज येत नाही. त्यामुळे जीव गेल्यावर खड्डे भरणार का? असा प्रश्न वाहनधारकांतून विचारला जात आहे.