शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पोवाडा, मशाल मिरवणूक
By admin | Published: April 28, 2017 12:27 AM2017-04-28T00:27:56+5:302017-04-28T00:27:56+5:30
उत्साहाला उधाण : शिवज्योत नेण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागातून मंडळे पन्हाळगडावर दाखल, मंडळांची लगबग
कोल्हापूर : परंपरेने साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात शिवज्योत नेण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागातून
मंडळे पन्हाळगडावर दाखल होत होती; तर काही मंडळांनी आपल्या मंडळांत शिवमूर्तीची प्रतिष्ठापना, पोवाड्याचे आयोजन केले होते. गुरुवारी रात्री संयुक्त उत्तरेश्वर पेठेतर्फे परिसरात मशाल मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळ, संयुक्त जुना बुधवार पेठ, संयुक्त उत्तरेश्वर पेठ, संयुक्त रविवार पेठ, राजारामपुरी, पापाची तिकटी येथे गेल्या दोन दिवसांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू तरुण मंडळ
मिरजकर तिकटी येथील राजर्षी शाहू तरुण मंडळ शिवजयंती उत्सवानिमित्त राष्ट्रपती पदक विजेते शिवशाहीर बजरंग आंबी आणि सहकारी यांनी ‘सिंह गर्जला सह्याद्रीचा’ हा शाहिरी पोवाडा सादर केला. यासह बुधवारी (दि. २६) या ठिकाणी सुरू झालेल्या खाद्यमहोत्सवासही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संयुक्त राजारामपुरी शिवजयंती
संयुक्त राजारामपुरी येथील मारुती मंदिर येथे गुरुवारी शिवज्योत आणण्यात आली. त्यानंतर दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रा. भालचंद्र त्रिवेदी, डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर पोवाड्यांचे सादरीकरण झाले. वखार ग्रुपकोल्हापूर जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने शिवजयंतीनिमित्त वखार ग्रुपतर्फे शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते.