दूध संघांच्या भल्यासाठीच पोषण आहारात पावडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:08 AM2018-10-22T00:08:21+5:302018-10-22T00:08:42+5:30
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील दूध संघांच्या भल्यासाठी शालेय पोषण आहारात दूध पावडर देण्याचा निर्णय ...
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील दूध संघांच्या भल्यासाठी शालेय पोषण आहारात दूध पावडर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामागे फॅटविरहित दूध विद्यार्थ्यांच्या माथी मारून दूध संघांकडील अतिरिक्त पावडर मुरविण्याचा शासनाचा प्रयत्न असला तरी पावडरीतून विद्यार्थ्यांना खरेच पोषक घटक मिळणार का? हा खरा प्रश्न असून, याबद्दल पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. द्यायचे असेल तर पावडरऐवजी गाईचे ‘सात्त्विक’ दूध द्या, अशी मागणी जोर धरत आहे.
जागतिक पातळीवर गाईचे दूध वाढल्याने बाजारपेठेत दूध पावडरची आवक वाढली आणि दर घसरले. देशांतर्गत बाजारपेठेतील दरही कमी आल्याने दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपात केली आणि आंदोलन उभे राहिले. राज्य शासनाने पावडर उत्पादनाबरोबर निर्यातीवरही भरघोस अनुदान दिले; पण दूध संघांना अपेक्षित दर मिळाला नाही आणि निर्यातीकडे दुर्लक्ष केल्याने पावडरीच्या थप्प्या पडून आहेत. संघांनी रेटा लावल्याने शालेय पोषण आहारात शासनाने दूध पावडरीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. शासन १३५ ते १४० रुपये किलोने पावडर खरेदी करणार, ती प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविण्यासाठी किलोमागे सुमारे १५ ते २० रुपये खर्च करावे लागणार आहे. एवढे करूनही पावडरीचे बेचव दूध विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
गाय व म्हैस दुधातील फॅट काढून घेऊन पावडर तयार केली जाते. पावडर व दुधातील पौष्टिकतेची तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे पावडरऐवजी थेट गाईचे दूध विद्यार्थ्यांना दिले तरी अधिक चांगले ठरू शकते. त्यामुळेच शासनाचा हा निर्णयच संशयास्पद आहे. खरोखरच गोरगरीब विद्यार्थ्यांना सुदृढ करण्यासाठी चांगला आहार द्यायचा आहे की अतिरिक्त पावडर विद्यार्थ्यांच्या पोटात घालून दूध संघांना खुश करायचे आहे, हे महत्वाचे आहे.
अतिरिक्त गाय दुधाचा प्रश्न संपेल
गाईचे अतिरिक्त दूध ही संघांची डोकेदुखी झाली आहे. पावडरऐवजी थेट दूधच विद्यार्थ्यांना दिले तर ते अधिक चांगले होईल. पूर्वी एक ग्लास भरून (साधारणत: २०० मि.लि.) गाईचे दूध दिले जात होते. स्थानिक पातळीवरून मुख्याध्यापकांनी दूध खरेदी करून त्याचे वाटप केले तर विद्यार्थ्यांना ताजे व सात्त्विक दूध मिळू शकते आणि अतिरिक्त दूध गावातच राहिल्याने दूध संघांवरही ताण येणार नाही.
कर्नाटकात ‘होल मिल्क पावडर’
कर्नाटकातील शाळांमध्ये कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना ‘होल मिल्क पावडर’चे वाटप केले जाते. फॅट काढून न घेता थेट दुधापासून ही पावडर तयार केली जाते.
पावडरपेक्षा दूध कसे परवडते
पावडरचा सध्या दर व शाळेपर्यंतची वाहतूक - १६० रुपये किलो, प्रत्येक विद्यार्थ्याला ५० ग्रॅम दिले - ८ रुपये, एक लिटर गाय दूध-२५ रूपये, प्रत्येक विद्यार्थ्याला २०० मि.लि. दिले - ५ रुपये