वीजनिर्मितीचा प्रकल्प दहा महिन्यांत
By admin | Published: April 23, 2016 01:19 AM2016-04-23T01:19:35+5:302016-04-23T01:43:55+5:30
स्थायी समिती सभा : सभा वेळेत सुरू न झाल्याने अजित ठाणेकर यांचा बहिष्कार
कोल्हापूर : शहरातून गोळा होणाऱ्या दैनंदिन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे काम पुढील दहा महिन्यांत पूर्ण करून घेण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी स्थायी समिती सभेत महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते. सभा वेळेत सुरू झाली नाही म्हणून भाजपच्या अजित ठाणेकर यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काय झाले, याची माहिती सत्यजित कदम यांनी प्रशासनास विचारली होती. त्याला अनुसरून ही माहिती देण्यात आली. ठेकेदार कंपनीस प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीला कर्जासाठी लागणारे रजिस्ट्रेशन लिज अग्रीमेंट आदी कागदपत्रे हवी आहेत त्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पावर मे अखेर सिव्हीलचे काम सुरू होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
आर. ई. इन्फ्राच्या कामाबाबत भरपूर तक्रारी आहेत. त्यांची कोणतीही बिले त्यांच्या कामाची तपासणी झाल्याशिवाय अदा करू नयेत, अशी सूचना मेहजबीन सुभेदार, सत्यजित कदम यांनी केली. ठेकेदारास दि. १७ मेपर्यंत कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. नगरोत्थानमधील ठेकेदारांनी कामे मुदतीत पूर्ण न केल्यास ती कामे सबलिड करून इतर ठेकेदारांना देण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाटणकर हायस्कूल व टाकाळा येथील प्रकल्पाचे काय झाले? निविदा मंजूर होऊन दोन वर्षे झाली, ठेकेदाराने अद्याप महापालिकेला बयाणा रक्कम भरलेली नाही. ठेकेदार काम करणार नाही, त्यात महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार जयश्री चव्हाण यांनी केली. त्यावेळी ठेकेदारास अंतिम नोटीस काढली आहे. लवकरच त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. यावेळी सुनील पाटील, रुपाराणी निकम, दीपा मगदूम, रिना कांबळे, आदींनी भाग घेतला.