भाताच्या तुसांपासून वीजनिर्मिती
By Admin | Published: February 9, 2016 12:41 AM2016-02-09T00:41:04+5:302016-02-09T00:45:48+5:30
माधव बापट यांचे संशोधन : घरातच थाटली प्रयोगशाळा
संतोष तोडकर कोल्हापूर
भाताच्या तुसांत सिलिकॉन असते. सिलिकॉन सेमी कंडक्टर असतो म्हणजे त्यापासून वीजनिर्मिती करता येऊ शकते. तुसांचा अर्क व त्यांची राख यामध्ये मिठाचे पाणी घालून तयार होणाऱ्या सिंगल सेलमधून एक ते ३० मिली अॅम्पियर वीजनिर्मिती होते. येथील रसायनशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या माधव बापट यांनी सन २००२ पासून यावर प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांच्या अथक परिश्रमांतून वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
पेशाने शिक्षक असलेले बापट निवृत्तीनंतर सातारा ते बेळगाव परिसरात अल्ट्रासॉनिक टेस्टिंगची कामे करायचे. मंदीमुळे त्यांना मिळणारी कामे कमी झाली. त्यामुळे कमी तांत्रिक गुंतागुंत, सुरक्षितता व कमी गुंतवणुकीत काही तरी करावे, असे त्यांना वाटत होते. भाताच्या तुसांत सिलिकॉन असल्याचे त्यांनी वाचले. रसायनशास्त्राचे पदवीधर असलेल्या बापट यांनी यासंबंधी संशोधन करण्याचे ठरविले. कपिलतीर्थ मार्केट परिसरातील राहत्या घरीच त्यांनी एका खोलीत प्रयोगशाळा थाटली. पहिल्यापासूनच काहीतरी वेगळे करून दाखवायची त्यांना आवड होती. काही काळ कोकणातील शाळेत सहायक शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीही पत्करली; पण शिक्षकीपेशात मन रमले नाही; त्यामुळे राजीनामा देऊन त्यांनी कोल्हापूरचा मार्ग धरला. ते सांगतात, ‘गेल्या तेरा वर्षांत असे हजारो प्रयोग केले आहेत. ही वीज सेलमध्ये साठवून ठेवू शकतो. हा सेल भिंतीवरील घड्याळात वापरता येतो. एकदा रेडिओमध्येही तो वापरून पाहिला. विजेचे दिवे, एलईडी बल्ब स्ट्रीप या सेलद्वारे वापरतो. त्यामुळे वीज बिलात बचत होते.’
भाजीचे देठ गॅसवर उकळवून मिळणाऱ्या अर्कात विशिष्ट प्रमाणात मिठाचा वापर करूनही वीजनिर्मिती करता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. आजही वीज न पोहोचलेल्या दुर्गम भागात अशी घरच्या घरी वीजनिर्मिती करुन घर प्रकाशमान करण्याचे बापट यांचे स्वप्न आहे. यासाठी शाळांमध्ये जाऊन ते मुलांचे प्रबोधनही करतात.
पेटंटसाठी प्रयत्न
कमीत कमी खर्चात व सुरक्षित अशा वीजनिर्मितीच्या संशोधनाचे पेटंट मिळावे यासाठी सन २००९ पासून भाताच्या तुसांपासून वीजनिर्मिती, सिलिकॉन आॅक्साईडपासून वीजनिर्मिती, बोटॅनिकल वेस्टपासून वीजनिर्मिती असे तीन अर्ज त्यांनी मुंबईतील भारत सरकारच्या पेटंट कार्यालयात पाठविले आहेत; पण अजूनही सरकारने आपल्या संशोधनाची दखल घेतली नसल्याची खंत बापट यांनी व्यक्त केली.