मराठा मोर्चाच्या ऊर्जेला हवे विधायकतेचे वळण
By admin | Published: May 9, 2017 12:41 AM2017-05-09T00:41:51+5:302017-05-09T00:41:51+5:30
जयसिंगराव पवार : ‘मराठा क्रांती मोर्चा एक अन्वयार्थ’ पुस्तकाचे प्रकाशन; स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात घरापासून झाली पाहिजे
लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : मराठ्यांनी इतिहास घडविला, पण कधी लिहिला नाही. मराठा क्रांती मोर्चा म्हणजे त्यांच्या व्यथेचा महास्फोट आहे. त्याची फूग हंगामी राहता कामा नये. लाखो लोक एकत्र येऊन राज्यकर्त्यांवर दबाव निर्माण करू शकतात हा आत्मविश्वास आम्हाला मिळाला. सगळीकडे अंधारमय वातावरण असताना मोर्चाने प्रकाशवाट दाखविली. मोर्चाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या ऊर्जेला आकाशात विरू न देता त्याचे विधायकतेत रूपांतर झाले पाहिजे, असे प्रतिपादन सोमवारी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये ‘मराठा क्रांती मोर्चा एक अन्वयार्थ’ या संपत देसाई व पत्रकार सुनील कोंडूसकर यांनी संपादन केलेल्या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते भारत पाटणकर होते. व्यासपीठावर डॉ. राजन गवस, डॉ. प्रकाश पवार, हुमायुन मुरसल उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘मराठा’ या शब्दाचे जगभरात मोठे आकर्षण आहे. ही केवळ जात नाही तर त्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक पैलू आहेत. महाराष्ट्राबाहेर आपण गेलो की मराठा. शिवाजी महाराजांचा इतिहास फ्रेंच, डच, इंग्लिश इतिहासकारांनी लिहिला. त्यामुळे आपल्याला शिवाजी महाराजांचे मोठेपण कळाले. आज मराठा क्रांती मोर्चाने गर्दीचे उच्चांक मोडले याचे कौतुक आहे. मात्र, तो कोपर्डी घटना, अॅट्रॉसिटी कायदा आणि आरक्षण या तीन प्रश्नांपुरताच मर्यादित राहू नये. मोर्चात महिलांना दिलेला प्राधान्य हा केवळ दिखाऊपणा ठरू नये तर स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात घरापासून झाली पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न न्यायालयीन आहे. लाखोंचा मोर्चा काढल्याने तो सुटणार नाही. त्यामुळे मोर्चाची व्याप्ती वाढवत त्यात शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, अशी मागणी केली पाहिजे.
डॉ. प्रकाश पवार म्हणाले, मोर्चामुळे आपल्या मानगुटीवर बसलेले इतिहासाचे भूत आता उतरू लागले आहे. समाजातील महिला त्यांच्या स्वातंत्र्याविषयी प्रश्न विचारू लागल्या आहेत. हक्क मिळविण्याच्या नव्या चळवळीचे प्रतिबिंब या मोर्चात उमटले. हा मोर्चा कोणत्याही धर्म-जाती विरोधात नाही, तर तो आपली व्यापकता मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
डॉ. राजन गवस म्हणाले, एखाद्या व्यक्तीने घेतलेल्या भूमिकेमागील सत्य समजून न घेता आपण त्याला जातीयवादी ठरवून मोकळे होतो. तहयात शोषितांचे जगणे झेललेल्या या समाजाचे प्रश्न शेती आणि स्त्रीची अवहेलना यामुळे पुढे आले. स्त्री मुक्ती झाली तर जातिअंताचा लढा अंतिम टप्प्यात येईल. मोर्चाचे पुढे काय होईल हे भविष्य ठरवेल. आता आव्हान अभ्यासक आणि संशोधकांसमोर आहे. ही वेळ उद्विग्न होण्याची नव्हे तर उदार होण्याची आहे.
हुमायुन मुरसल म्हणाले, जागतिकीकरणाच्या या युगात सगळे जाती-धर्म पिसून निघणार आहे. जेवढे दु:ख अन्य समाजाने भोगले तेवढीच दु:खे मराठा समाजाच्याही वाट्याला आली.
भारत पाटणकर म्हणाले, मराठा समाज सुरुवातीपासूनच शोषित राहिला आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक मागास हा निकष असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. जातिअंतानेच समाजाची प्रगती होईल. संपत देसाई यांनी प्रास्ताविक, सुधीर नलवडे यांनी सूत्रसंचालन केले.
ब्राह्मणांची पोरं का दिसत नाही..
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, गल्ली-बोळातल्या तरुण मंडळांतील पोरं जयंती, उत्सवाच्या नावाखाली वाट्टेल ते करतात, नाचतात; पण त्यात ब्राह्मणाचा एकही मुलगा नसतो. गरीब, आत्महत्या करणारा, माथाडी कामगार यांच्यामध्ये एकही ब्राह्मण नाही. आमचे अनेक प्रश्न आहेत. जे अगदी घरापासून सुरू होतात. त्यांच्याकडे आपण गांभीर्याने कधी पाहणार. आज गरिबांचे राज्य नाही तर त्यांच्या नावाने राज्य केले जाते.