वीज कधीच दुसरी संधी देत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2017 01:14 AM2017-01-12T01:14:14+5:302017-01-12T01:14:14+5:30
मुख्य अभियंता सोनवणे : वीज सुरक्षा सप्ताहास प्रारंभ
कोल्हापूर : दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाचा अनेक वीज उपकरणांशी संबंध येत असतो. अशी वीज उपकरणे हाताळताना अतिआत्मविश्वास जिवावर बेतू शकतो; कारण वीज कधीच दुसरा चान्स देत नाही. त्यामुळे सुरक्षिततेचे उपाय योजल्याशिवाय विजेची उपकरणे हाताळू नयेत, असे आवाहन महावितरण कोल्हापूर परिमंडलचे प्रभारी मुख्य अभियंता जितेंद्र सोनवणे यांन
ी केले.
राज्यात ‘वीज सुरक्षा सप्ताह’ साजरा केला जात आहे. कोल्हापुरात विद्युत निरीक्षक कार्यालय, महावितरण व कोल्हापूर जिल्हा इलेक्ट्रिकल कॉँट्रॅक्टर असोसिएशन यांच्यातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवारी त्याच्या उद्घाटनाच्या समारंभात सोनवणे बोलत होते. व्यासपीठावर महापालिकेचे उपायुक्त श्रीधर पाटणकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजाराम बुरुड, महापारेषणचे अधीक्षक अभियंता अनिल कोलप, विद्युत निरीक्षक एफ. एम. मुल्ला, इलेक्ट्रिकल कॉँट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चाळके, आदींची उपस्थिती होती.
सुरक्षेची साधने उपलब्ध असली तरीही त्यांचा सर्रास उपयोग होत नसल्याने विजेच्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; म्हणूनच सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जनतेची विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करावी लागत असल्याचे विद्युत निरीक्षक मुल्ला यांनी सांगितले. सप्ताहात रोज किमान आठ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे दिले जाणार आहेत. कार्यक्रमास महावितरणचे कार्यकारी अभियंते सुनील माने, राजेंद्र हजारे, आनंदराव माने, एन. बी. बारसिंग, सागर मारुलकर, माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपमहाव्यवस्थापक मोहन चव्हाण, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, आदींसह वीज अभियंते, उपस्थित होते.