कळे, सावर्डे परिसरात विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:22+5:302021-04-29T04:18:22+5:30
सावर्डे : कळे, सावर्डे ( ता.पन्हाळा ) परिसरात विद्युतपुरवठ्यामध्ये सतत बिघाड होत असल्याने पाण्याअभावी पिके कोमेजून गेली आहेत. ...
सावर्डे : कळे, सावर्डे ( ता.पन्हाळा ) परिसरात विद्युतपुरवठ्यामध्ये सतत बिघाड होत असल्याने पाण्याअभावी पिके कोमेजून गेली आहेत. विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने महावितरणच्या कळे उपविभागीय कार्यालयाच्या कामकाजाबाबत शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
आठ- दहा दिवसांपासून शेतीपंपाच्या विद्युतपुरवठ्यात सतत बिघाड होत असल्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज कधी येईल आणि कधी जाईल याचा नेम राहिला नसल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत. या परिसरात दिवसा तीन, तर रात्रीचे चार दिवस विद्युत पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना दिलेल्या नियोजित वेळेत जर विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यास पुन्हा वाढीव वीज दिली जात नाही. आठ-आठ तास वीज नसली तर केवळ सुमारे एक ते दोनच तास वीज दिली जाते. त्यामुळे जेवढा वेळ वीज गेली आहे. तितकाच वेळ वीज जास्त मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
चौकट : गत आठवड्यात वीजपुरवठा सुरळीत चालू नसल्यामुळे पिके पाण्याअभावी कोमेजून गेली आहेत. कळे वीज वितरण कार्यालयात वीज केव्हा येणार म्हणून फोन केल्यास समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन विद्युतपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी कळे, सावर्डे, मल्हारपेठ, मोरेवाडी, मरळी, चिंचवडे गावांतील शेतकऱ्यांमधून होत आहे.
कोट : या आठवड्यात विजेचा लपंडाव सुरु आहे. आठ दिवसांत एक एकर देखील शेत भिजलेले नाही. पिके वाळू लागली आहेत.
अमित पाटील, शेतकरी, सावर्डे.
कोट : वीजपुरवठ्यात नेहमी बिघाड होत नाही. या आठवड्यात तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची थोडी गैरसोय झाली. पण येथून पुढे सुरळीत विद्युतपुरवठा केला जाईल.
सचिन पाटणकर, उपकार्यकारी अभियंता, उपविभाग महावितरण कार्यालय, कळे