प्रशासन, लोकप्रतिनिधींमुळे फेरीवाल्यांचा ताकतुंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:39+5:302021-02-11T04:24:39+5:30
अंबाबाई मंदिराच्या समोरील महाद्वार व ताराबाई रोडवर मंदिरापासून शंभर मीटरच्या आत कोणत्याही फेरीवाल्यास तसेच अन्य विक्रेत्यास बसता येणार ...
अंबाबाई मंदिराच्या समोरील महाद्वार व ताराबाई रोडवर मंदिरापासून शंभर मीटरच्या आत कोणत्याही फेरीवाल्यास तसेच अन्य विक्रेत्यास बसता येणार नाही, असा फतवा महापालिका प्रशासनाने काढला आहे. वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले तसेच विक्रेत्यांना मंदिरापासून शंभर मीटरबाहेर पट्टे मारून तेथे व्यवसाय करा, असा आदेश दिला आहे; परंतु या पर्यायाला अन्य दुकानदार, व्यावसायिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे आणखी त्रांगडे निर्माण झाले आहे.
प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने बुधवारी तिसऱ्या दिवशी अतिक्रमण निर्मूलन विभाग, विभागीय कार्यालय, अग्निशमन दल यांचे कर्मचारी फेरीवाल्यांना तसेच विक्रेत्यांना तेथून हटविण्यास गेले; परंतु त्याठिकाणी महिलांसह पुरुष विक्रेत्यांची संख्या अधिक आणि महापालिका कर्मचारी कमी होते. काही तरी गोंधळ होईल म्हणून ठोस कारवाई करण्यास कर्मचारी कचरले. पोलीस बंदोबस्त मागविला होता, असे सांगण्यात आले; परंतु पोलीसही आले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडे फेरीवाल्यांना विनंती करण्यापलीकडे दुसरा मार्ग नव्हता. पर्यायी जागेत जाण्याची विनंती केली. एक तासाची मुदत दिली; परंतु विक्रेते, फेरीवाले पर्यायी जागेत जायला तयार झाले नाहीत. नंतर स्पष्ट आदेश नसल्याने कर्मचाऱ्यांनी कारवाई केली नाही.
-चौकट - १
-शनिवारी बैठक होईपर्यंत थांबा-
आमदार चंद्रकांत पाटील दुपारी महाद्वार रोडवर आले. त्यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पंडित पोवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आमदार जाधव यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी संपर्क साधून शनिवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ बैठक घेणार आहेत, तोपर्यंत कारवाई थांबवा, आपण चर्चेतून मार्ग काढू, अशी विनंती केली. नंतर जाधव यांनी दोन्ही रस्त्यांवर प्रशासनाने केलेल्या पर्यायी नियोजनाची माहिती घेतली.
-चौकट - २
बऱ्याच वेळाने चर्चेला बोलाविले -
आमदार जाधव तेथून जाताच पुन्हा अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी नेत्रदीप सरनोबतना फोन करून फेरीवाले व विक्रेते यांना सायंकाळी पाच वाजता महापालिकेत चर्चेला या असा निरोप दिला; परंतु मंत्री मुश्रीफ, आमदार जाधव, आर. के. पोवार यांच्या उपस्थितीतच चर्चा होणार असताना आता पुन्हा कशाला बोलावताय म्हणून बैठकीस जाण्यास नकार दिला.