बोजा पडला तरी वीज सवलत द्या
By admin | Published: January 3, 2015 12:09 AM2015-01-03T00:09:15+5:302015-01-03T00:09:31+5:30
सुरेंद्र जैन : अन्यथा, कर्नाटकात जाण्याचा उद्योजकांचा इशारा
शिरोली : महाराष्ट्र शासनाने उद्योगांना वाचविण्यासाठी सवलतीच्या दरात वीज द्यावी, यासाठी शासनावर कर्जाचा बोजा पडला तरीही शासनाने तो सोसावा, अन्यथा आम्ही कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी पत्रकार बैठकीत दिला. बैठकीस जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जैन म्हणाले, राज्य शासन राज्यात कोणतीही आपत्ती आली तर कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करते. वीज दरवाढ ही उद्योगांवरील मोठी आपत्ती आणि संकट आहे. ती दूर करण्यासाठी राज्य शासनावर जरी कर्जाचा बोजा पडत असला, तरी तो शासनाने सोसून उद्योजकांना इतर राज्यांप्रमाणे सवलतीच्या दरात वीज द्यावी. उद्योगांना मोठी मंदी आहे. तरी यातून शासनाने उद्योजकांची सुटका करावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे कोल्हापूरला आले. उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निघून गेले. त्यांनी उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. उद्योग जगवायचे असतील, तर विजेच्या दरात सवलत द्यायलाच पाहिजे, अन्यथा उद्योग परराज्यांत जातील. राज्यातील उद्योजकांना सवलतीच्या दरात वीज मिळत नाही, म्हणून उद्योग परराज्यात चालले आहेत. महावितरणकडून वीज उचललेली नाही. त्यामुळे महावितरणवर पडलेला बोजा भरून काढण्यासाठी वीज दरवाढ केली जाते. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात विजेचे दर अधिक असल्याने महाराष्ट्रात नवीन उद्योग येत नाहीत. राज्यात आहेत त्या उद्योगांच्या विजेचे दर शासन कमी करू शकत नाही आणि नवीन दोन कोटींची गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना काय सुविधा देणार? शासनाने उद्योगांना वीज सवलत नाही दिली तर उद्योग बंद पडतील. तसेच आम्हाला सध्या कोणत्याच सुविधा नकोत, फक्त वीज दरवाढ कमी करा, असेही ‘गोशिमा’चे अध्यक्ष अजित आजरी म्हणाले.
उद्योगांना चालू महिन्यात फक्त २० टक्के इतकी कामाच्या आॅर्डरी आहेत आणि मग उद्योजक कसा जगेल. एका बाजूला मोठी मंदी आणि दुसऱ्या बाजूला वीज दरवाढ यामुळे उद्योजक होरपळून जात आहे, असे राजू पाटील म्हणाले.
यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंगचे अध्यक्ष रवींद्र तेंडुलकर, कागल मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, अतुल पाटील, सचिन पाटील, संजय उरमट्टी, संजय जोशी, सचिव टी. एस. घाटगे, आदी उपस्थित होते.