जयसिंगपुरात एलईडी पथदिव्यांमुळे विजेची बचत

By Admin | Published: March 26, 2017 11:40 PM2017-03-26T23:40:25+5:302017-03-26T23:40:25+5:30

पथदिवे प्रकल्पाची वर्षपूर्ती : महिन्याकाठी सव्वा लाखाची वीज बचत

Power saving due to LED street lights at Jaysingpur | जयसिंगपुरात एलईडी पथदिव्यांमुळे विजेची बचत

जयसिंगपुरात एलईडी पथदिव्यांमुळे विजेची बचत

googlenewsNext



संदीप बावचे ल्ल जयसिंगपूर
कथित गैरव्यवहारप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या जयसिंगपूर शहरातील एलईडी पथदिवे प्रकल्पाला वर्ष पूर्ण होत आहे. या प्रकल्पामुळे निश्चितच विजेची बचत झाली आहे. महिन्याकाठी सरासरी पावणेदोन लाख रुपये सध्या वीजबिल येत असून, एलईडी पथदिव्यामुळे महिन्याकाठी सव्वालाख रुपयांची बचत असे पालिकेचे वार्षिक पंधरा लाख रुपयांचे वीजबिल कमी झाले आहे. ज्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात आला; तो निश्चितच फायदेशीर ठरला आहे.
आखीव-रेखीव अशी जयसिंगपूर शहराची ओळख आहे. स्वच्छ प्रकाश आणि विजेची बचत या धोरणानुसार जयसिंगपूर पालिकेने तेराव्या वित्त आयोगातून शहरात एलईडी पथदिवे हा प्रकल्प राबविला होता. १ कोटी ९० लाख रुपये खर्च करून एलईडी पथदिवे बसविण्यात आले. सुमारे १७३८ एलईडी बल्ब वापरण्यात आले आहेत. एलईडी पथदिवे लावण्यापूर्वी स्ट्रीट लाईटमुळे सुमारे २ हजार युनिट वीज खर्च होत होती. त्यापोटी सुमारे ३ लाख रुपये देखभाल व दुरुस्तीसाठी खर्च होत होते. मार्च २०१६ मध्ये एलईडी पथदिवे प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या प्रकल्पामुळे सध्या महिन्याकाठी १ लाख ७५ हजार रुपये वीज बिल येते. सरासरी सव्वा लाख रुपयांची बचत महिन्याकाठी झाल्यामुळे या वीज बचतीतून पालिकेचे वर्षाला पंधरा लाख रुपये वाचले आहेत. यामुळे वीज बिलाचा आर्थिक ताण कमी झाला आहे. ज्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली तो उद्देश आणखी पूर्णत्वास येण्यासाठी पालिका प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
एलईडीमुळे विजेची बचत
गेल्या वर्षभरापासून जयसिंगपूर शहर पथदिव्यांनी उजळून गेले आहे. या प्रकल्पानंतर पन्नास टक्के विजेची बचत होणार असा पालिकेचा अंदाज होता. मात्र, विद्युत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्यातरी ४० टक्के विजेची बचत होत आहे. हा प्रकल्प राबविणारी कंपनी सात वर्षे देखभाल दुरुस्ती करणार आहे. आणखी काही भागात नवीन विजेच्या खांबाबरोबर पथदिव्यांची गरज आहे.
गैरव्यवहाराचा आरोप कागदावरच
जयसिंगपूर नगरपालिकेने शहरात बसविलेल्या एलईडी पथदिव्याच्या कामात १ कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्वाभिमानी युवा आघाडीने केला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीदेखील दाखल झाल्या होत्या. गैरव्यवहाराच्या आरोपावरुन पालिका सभाही गाजली होती. गैरव्यवहाराचा आरोप करणाऱ्यांनी पुढे काय पाठपुरावा केला, हे अजूनही स्पष्ट केलेले नाही.
पथदिव्यांची दुरुस्ती
जयसिंगपूर शहरात एलईडी पथदिवे लावण्यात आल्यानंतर काही ठिकाणी पथदिवे लागत नसल्याच्या तक्रारी सुरुवातीला झाल्या होत्या. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा झाली. मात्र, सध्या काही ठिकाणी पथदिवे बंद असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत नगरपालिका विद्युत विभागाशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या ठिकाणी पथदिवे लागत नव्हते, त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे.

Web Title: Power saving due to LED street lights at Jaysingpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.