हद्दवाढीसाठी उद्या शक्तिप्रदर्शन
By Admin | Published: August 21, 2016 12:14 AM2016-08-21T00:14:09+5:302016-08-21T00:20:45+5:30
दसरा चौकात ठिय्या : आज मध्यवर्ती बसस्थानकावर मेळावा
कोल्हापूर : अधिसूचना तातडीने काढून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्यावतीने उद्या, सोमवारी दसरा चौकात शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार जनजागृती मेळाव्यात केला. शक्तिप्रदर्शनाचा भाग म्हणून सोमवारी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांसह शहरवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी झाला. येत्या आठवड्यात हद्दवाढीच्या मागणीचा लढा तीव्र करत शासनाला हद्दवाढीच्या निर्णयासाठीभाग पाडू, असाही निर्धार केला. आज, रविवारी सायंकाळी सात वाजता मध्यवर्ती बसस्थानकावर महालक्ष्मी चेंबर्समध्ये दुसरा जनजागृती मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी भाकपचे सतीशचंद्र कांबळे, लालासाहेब गायकवाड, प्रताप देसाई, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, चंद्रकांत जाधव, सुरेश जरग यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी बाबा पार्टे, वहिदा मुजावर, रेखा आवळे, बजरंग शेलार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दबावतंत्र चालणार
नाही : क्षीरसागर
उजळाईवाडी विमानतळावर विमान उतरू देणार नाही, अशा पद्धतीची दादागिरी खपवून घेणार नाही. दबावतंत्र वापरून हद्दवाढ रोखण्याचा प्रयत्न नेत्यांनी बंद करावा, मतांच्या राजकारणासाठी शहरासह ग्रामीण भागाचे नुकसान करत आहेत. हद्दवाढीनंतर येणाऱ्या आय.टी.सह इतर उद्योगांमुळे ग्रामीण ग्रामीण भागाचे कल्याण होईल, असे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले. महापालिकेवर चुकीची टीका करून दबावतंत्र वापरत दादागिरी करण्याचा प्रयत्न केल्यास ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असाही इशारा क्षीरसागर यांनी दिला.
शासन बदलले, आरक्षणाचा उद्योग संपला
जमिनीवर आरक्षण टाकण्याचे उद्योग यापूर्वी झाले, आता शासन बदलले तसेच महापालिकेवरील स्थित्यांतरे झाल्याने आरक्षण टाकणे व उठविणे हा उद्योग यापुढे होणार नाही, असे भाजपचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी स्पष्ट केले. रवीकिरण इंगवले यांनीही टीका केली.
अभी नहीं तो कभी नहीं
शहरवासीयांचा आता अंत पाहू नका, असे सांगत सोमवारच्या शक्तिप्रदर्शनात महापालिका, के.एम.टी., शाळा, महाविद्यालये, तालीम सहभागी होणार असल्याचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी सांगून, ‘अभी नहीं तो कभी नहीं’ अशा निर्णायक लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एका व्यासपीठावर या
शहरवासीय व महापालिकेवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या ग्रामीण नेत्यांनी आमने-सामने यावे, एकाच व्यासपीठावर येऊन आरोप सिद्ध करावे, असे आव्हान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी केले.