पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Published: December 31, 2015 11:39 PM2015-12-31T23:39:40+5:302016-01-01T00:04:02+5:30

महावितरणची कारवाई : बुबनाळसह सात गावांचे वीज बिल थकले

Power supply of water schemes breaks | पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित

पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित

Next

बुबनाळ : शिरोळ तालुक्यातील बुबनाळसह औरवाड, आलास, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ व गणेशवाडी या नदीपलीकडील सात गावांतील पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी पुरवठा योजनेंचे वीज बिल थकबाकीपोटी महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांत ‘नदी उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.
शिरोळ तालुक्यात ५३ गावे असून, प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजना कार्यन्वित आहेत. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात सर्वच योजनांची वीज बिले थकीत आहेत. असे असताना विद्युत वितरण कंपनीने सात गावांतीलच नळपाणी पुरवठा योजनेंवर वीज बिल थकबाकीपोटी कारवाईचा बडगा उगारला आहे. वितरण कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुल्ले यांनी संबंधित विभागाला ग्रामपंचायतीची घरपट्टी वसुली बंद असल्यामुळे ग्रामपंचायत अडचणीत आहेत, त्यामुळे पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी पुरवठा योजनेच्या वीज बिल थकबाकीपोटी वीज कनेक्शन तोडू नये, असे लेखी पत्र देऊनही वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. नदीपलीकडील आलास, बुबनाळ, औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ व गणेशवाडी या गावांत नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. योजनांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे सात गावांत पाणीटंचाई निर्माण होणार असून, नदी उशाला असूनही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणार असेच चित्र आहे. (वार्ताहर)

शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील सात गावांतील पाणीपुरवठा योजनांची लाखो रुपयांची वीज बिले थकीत आहेत. याबाबत कंपनीकडून वेळोवेळी सूचना देऊनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. १० जानेवारीपर्यंत वीज बिल भरण्याबाबत लेखी पत्र ग्रामपंचायतीने कंपनीला देऊन वीजपुरवठा सुरळीत करून घेण्याबाबत ग्रामपंचायतींना कळविले आहे.
- एस. डी. अकिवाटे,
उपकार्यकारी अभियंता, शिरोळ

ग्रामपंचायतींच्या थकीत असलेल्या घरफाळ्यांची वसुली तूर्तच सुरू झाली आहे. मात्र, ग्रामस्थांकडून वसुली होत नसल्यामुळे ग्रामपंचायतींना अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतींना वीज बिल भरण्यासाठी आणखी थोडे दिवस मुदत देऊन महावितरण कंपनीने सहकार्य करून वीज पुरवठा सुरळीत करावा.
- सुनंदा दानोळे,
जि. प. सदस्य, आलास

Web Title: Power supply of water schemes breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.