यड्रावच्या पाच प्रोसेसचा विद्युत पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:26 AM2021-03-10T04:26:33+5:302021-03-10T04:26:33+5:30
यड्राव : महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या येथील उद्योगांना प्रक्रिया बंद ठेवण्याचे ...
यड्राव : महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या येथील उद्योगांना प्रक्रिया बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तरीही काही उद्योगांनी प्रदूषण मंडळाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून उद्योग सुरू ठेवल्याने पार्वती औद्योगिक वसाहतीमधील पाच प्रोसेसचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईने प्रक्रिया उद्योगामध्ये खळबळ माजली आहे.
गेल्या महिन्यापासून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. येथील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस दिली होती. तर मनपसंद, बाहुबली, ज्युबिली, बिर्ला व आयकोटेक्स या कापडावर प्रक्रिया करणाश्ऱ्या पाच उद्योगांना प्रक्रिया बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु यातील बऱ्याच उद्योगांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशास केराची टोपली दाखवून प्रक्रिया उद्योग सुरू ठेवल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित उद्योगांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रानुसार उपकार्यकारी अभियंता सुनील अकिवाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता अभिजित बिरनाळे यांच्या पथकाने मनपसंद, बाहुबली, ज्युबिली, बिर्ला व आयकोटेक्स या पाचही उद्योगांचा विद्युत पुरवठा खंडित केला. यामुळे प्रक्रिया उद्योग किती दिवस बंद राहणार, हे माहीत नसल्याने या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या ६०० हून अधिक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.