वीज दरवाढीविरोधी लढ्याचे रणशिंग
By admin | Published: February 28, 2015 12:16 AM2015-02-28T00:16:54+5:302015-02-28T00:21:34+5:30
वीज बिलांची होळी : लढ्यात एकसंधपणे सामील होण्याचे एन. डी. पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर : वाढीव दराने आलेल्या वीज बिलांची महावितरणच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या दारात होळी करीत ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी वीज दरवाढविरोधी लढ्याचे रणशिंग शुक्रवारी कोल्हापुरातून फुंकले. वीज बिलांची होळी हा सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न असून, आगामी काळात सरकारविरोधात तीव्र लढा उभा करणार असून, या लढ्यात एकसंधपणे ताकदीने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. लढा देण्यास आळस केलात तर तो जीवघेणा ठरेल, असा इशाराही प्रा. पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.
राज्य सरकारसह वीज वितरण कंपनीवर कडाडून हल्ला चढवत प्रा. पाटील म्हणाले, आई जेवू घालेना व बाप भीक मागू देईना, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. विजेचे दर वाढत असताना शेतीमालाला त्याप्रमाणात भाववाढ मिळत नाही. शेतकऱ्यांकडे दहा हजार कोटींची थकबाकी असल्याची थाप महावितरण मारत आहे, त्यामध्ये तथ्य नाही. शेतकऱ्यांच्या नावाने सरकारकडून अनुदान हडप करायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढून ओरडायचे हे खपवून घेतले जाणार नाही. इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून लढा दिल्यानेच शेतकऱ्यांचे २० हजार कोटी वाचले, पुढेही ही लढाई सुरूच ठेवावी लागेल, आळस करू नका; अन्यथा स्वत:च्या पायावर दगड पाडून घ्याल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रताप होगाडे म्हणाले, सोलर पंप शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्याऐवजी सरकारनेच १ मेगावॅटचे प्रकल्प तयार करून सोलर पंप नको, सोलर वीज शेतकऱ्यांना द्यावी. यावेळी बाबासाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, आर. जी. तांबे, मारुतराव जाधव, आदी उपस्थित होते.