घरफाळा, पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची प्रबोधन रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:10+5:302021-02-06T04:41:10+5:30
कोल्हापूर : शहरातील मिळकतधारक व नळ कनेक्शनधारक यांना कराच्या थकीत रकमेवर येणाऱ्या दंडाच्या आकारणीमध्ये महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी ...
कोल्हापूर : शहरातील मिळकतधारक व नळ कनेक्शनधारक यांना कराच्या थकीत रकमेवर येणाऱ्या दंडाच्या आकारणीमध्ये महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी विविध सवलत योजना जाहीर केली असून, योजनेचा लाभ जास्तीत जास्त मिळकतधारकांना घेता यावा यासाठी महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी शहरातून मुख्य रस्त्यावरून गुरुवारी प्रबोधन रॅली काढली.
रॅली शहरातील मध्यवर्ती बसस्थानकपासून राजारामपुरी बस मार्ग ते राजारामपूरी मेनरोडपासून बागल चौक, पार्वती टॉकीज चौक, उमा टॉकीज चौक, आझाद चौक, मिरजरकर तिकटी, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी ते महापालिका अशी काढण्यात आली.
रॅलीत महापालिकेचे अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत, कर अधीक्षक विलास साळोखे, तानाजी मोरे, अचुत अडूरकर, विजय वणकुद्रे यांच्यासह विविध विभागांतील सुमारे २०० कर्मचाऱ्यांनी आपल्या वाहनांसह सहभाग घेतला.
महापालिकेच्यावतीने दिलेल्या या सवलत योजनेमध्ये गुरुवारअखेर सुमारे २६४९ नागरिकांनी लाभ घेतला असून, त्यामधून घरफाळापोटी तीन कोटी ५० लाख रुपये व पाणीपट्टीपोटी एक कोटी १० लाख रुपये जमा झाले आहेत. गुरुवारी ५४ लाख रुपये घरफाळा जमा झाला.
या सवलत योजनेमध्ये नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून आपली थकबाकी व चालू मागणी भरणा करून जप्ती, वॉरंट, मिळकतीवर बोजा नोंद चढविणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.