प्रायोगिक तत्त्वावर उचगाव, मुडशिंगी, कळंबा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:42 PM2020-02-19T13:42:35+5:302020-02-19T13:47:34+5:30
पंचगंगा नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी सरनोबतवाडी ते उचगाव, मुडशिंगी ते गांधीनगर तसेच कळंबा ते मोरेवाडी या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे.
कोल्हापूर : पंचगंगा नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी सरनोबतवाडी ते उचगाव, मुडशिंगी ते गांधीनगर तसेच कळंबा ते मोरेवाडी या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर हे काम करून त्यानंतर ग्रामीण भागातील नाल्यांवर असे प्रकल्प उभारण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. तसेच कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या गावात कचऱ्यासाठी क्लस्टर करावे, असेही निर्देश प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.
पंचगंगा प्रदूषणासंदर्भात बैठकीसाठी उद्या, गुरुवारी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे दौऱ्यांवर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा परिषद, कोल्हापूर विकास क्षेत्र प्राधिकरण, महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल होते. प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, कोल्हापूर विकास क्षेत्र प्राधिकरणचे अधिकारी शिवराज पाटील, जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, आदींची होती.
अमन मित्तल म्हणाले, पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदीकाठावरील गावांमधून येणारे पाणी थांबविले पाहिजे. यासाठी जिल्हा परिषद व प्राधिकरणाकडून हवे ते सहकार्य केले जाईल. तसेच, गावातून येणारे सांडपाणी गावातच शुद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
यामध्ये सरनोबतवाडी ते उचगाव, मुडशिंगी ते गांधीनगर व कळंबा ते मोरेवाडीमध्ये सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी अधिकारी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतील. त्यानंतर योग्य ठिकाणी हा प्रकल्प उभारला जाईल.
यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यापैकी दोन जागांवर सांडपाणी प्रकल्प उभारला तर लोकांना याची माहिती पटवून देता येणार आहे. त्यामुळे गावागावात होणाऱ्या सांडपाण्याकडे लोक गांभीर्याने बघायला लागतील आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, तेरवाड बंधाऱ्यावर वारंवार मासे मृत होत आहेत. या ठिकाणी पाणी अडवले जाते. हे पाणी बंधाऱ्याच्या क्षमतेपक्षा १६ टक्के पाणी प्रवाहीत केले पाहिजे. तरच प्रदूषणाला आळा बसेल असे चित्र आहे. त्यामुळे हे पाणी प्रवाहित करण्याबाबतही निर्णय झाला आहे. इचलकरंजी येथील प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी असलेल्या पूर्वीच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे यावेळी ठरले.
प्राधिकरणच्या गावांत कचऱ्यासाठी क्लस्टर
कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या गावातील कचऱ्यासाठी क्लस्टर तयार करावेत, त्यासाठी गावनिहाय, कॉलनीनिहाय जागानिश्चित करावी, असे निर्देश प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.