प्रॅक्टिस ‘अ’कडून दिलबहार ‘अ’ पराभूत : अटल चषक फुटबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:36 AM2019-02-22T00:36:37+5:302019-02-22T00:37:13+5:30
कोल्हापूर : डेव्हिड ओपेरा, श्रेयस मोरे, राहुल पाटील यांच्या गोलच्या जोरावर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने तुल्यबळ दिलबहार तालीम मंडळ ...
कोल्हापूर : डेव्हिड ओपेरा, श्रेयस मोरे, राहुल पाटील यांच्या गोलच्या जोरावर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने तुल्यबळ दिलबहार तालीम मंडळ ‘अ’चा ३-२ असा पराभव करीत अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला.
शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी या दोन संघांत सामना झाला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला ‘दिलबहार’च्या खेळाडूने ‘प्रॅक्टिस’ची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ‘प्रॅक्टिस’चा गोलरक्षक अल्फाज हकीम याने अवैधरीत्या अडविल्याबद्दल पंचांनी दिलबहार संघास पेनल्टी बहाल केली. त्यावर इमॅन्युअल इचिबेरी याने मारलेला फटका थेट गोलरक्षकाच्या हातात गेल्याने गोल करण्याची दिलबहार संघाची सोपी संधी वाया गेली. ‘प्रॅक्टिस’कडून ३९ व्या मिनिटास डेव्हिड ओपेरा याने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ५४ व्या मिनिटास ‘प्रॅक्टिस’कडून श्रेयस मोरेने संघाचा दुसरा गोल नोंदविला. त्यानंतर ‘दिलबहार’कडून ५८ व्या मिनिटाला इचिबेरीने दिलेल्या पासवर राहुल तळेकरने गोल करीत संघाची आघाडी २-१ ने कमी केली. त्यानंतर ७९ व्या मिनिटास प्रॅक्टिसकडून डेव्हिड ओपेराच्या पासवर राहुल पाटीलने गोल करीत संघास ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. याच गोलसंख्येवर प्रॅक्टिस विजयी होईल, असे वाटत असताना जादाच्या वेळेत दिलबहारच्या खेळाडूस प्रॅक्टिसच्या गोलक्षेत्रात अवैधरीत्या अडविले. त्यामुळे पंचांनी दिलबहारला पेनल्टी बहाल केली. त्यावर सचिन पाटीलने गोल करीत आघाडी ३-२ ने कमी केली.
हुल्लडबाजी रोखा
सामन्यादरम्यान वरील प्रेक्षक गॅलरीत दोन गटांत हाणामारी झाली. त्यामुळे दोन वेळा प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत संबंधितांना ताब्यात घेतले. अशा हुल्लडबाजांवर कडक कारवाई करावी, असे मत अनेक ज्येष्ठ फुटबॉलपटूंनी व्यक्त केले. सामन्यादरम्यान ‘प्रॅक्टिस’च्या डेव्हिड ओपेराने एक गोल करण्यासाठी संघातील खेळाडूला पास दिला. त्यावर आनंद व्यक्त करीत मैदानावर त्याने नृत्य केले. त्याचे हे नृत्य लक्षवेधी ठरले.