शाळेच्या २०० पायऱ्या चढउतार हाच सराव
By admin | Published: August 11, 2015 11:46 PM2015-08-11T23:46:16+5:302015-08-11T23:46:16+5:30
यशस्वी चढाई : कोल्हापूरच्या खुशीने केली दोन शिखरे सर
कोल्हापूर : हिमालयातील क्षितिधर शिखर सर करताना फारशी अशी तयारी केली नव्हती; फक्त एकच केले होते, दररोज शाळेच्या २०० पायऱ्यांवर पंधरा किलो ओझे घेऊन किमान पंधरा वेळेला चढउतार करीत होते, अशी प्रतिक्रिया चौदावर्षीय गिर्यारोहक खुशी विनोद कांबोज हिने व्यक्त केली. हिमालयातील १९ हजारांवरील हनुमान तिब्बा व १७ हजार २२४ फूट उंचीवरील क्षितिधर शिखरावर यशस्वी चढाई केल्यानंतर खुशी सोमवारी कोल्हापुरात आली. तिच्याशी संवाद साधल्यानंतर तिने गिर्यारोहणातील अनुभव ‘लोकमत’ला सांगितले. आमची ही मोहीम २२ दिवसांची होती. मोहिमेत दोन पथके सहभागी झाली होती. हनुमान तिब्बा हा ट्रेक १९ हजार ४६२ फुटांचा आहे, तर क्षितिधर मोहीम १७ हजार २२४ फुटांची होती. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रेकिंगचा अनुभव माझ्या पाठीशी होता; पण हिमालयातील गिर्यारोहणाचा अनुभव नवा होता. याबाबत माझ्या वडिलांनी त्यांचा अनुभव मला सांगितला होता. यासाठी मी शाळेतील २०० पायऱ्या पंधरा किलो ओझे घेऊन दररोज चढत होते. बर्फाने आच्छादित असलेल्या परिसरात गिर्यारोहण करणे तितके सोपे नसल्याने आम्ही जुन्नरला जाऊन आवश्यक तयारी करून घेतली. त्यानंतर मुंबईला गेलो आणि तेथून मनालीला पोहोचलो. आमचा बेस कॅम्प बियास्कूनला होता. तेथील वातावरणाशी मिळतेजुळते घेण्यासाठी चार ते पाच दिवस बारा ते चौदा किलोमीटर चालण्याचा सराव केला.
त्यानंतर २३ जुलै रोजी क्षितिधरकडे चढाई करण्याचा दिवस जेव्हा उजाडला तेव्हा एक समस्या निर्माण झाली. त्या मार्गावर अनेक अपघात झाल्याचे समजले. त्यामुळे आम्हाला नियोजन बदलावे लागले. पूर्वीचे चढाईसाठी केलेले नियोजन व मार्ग वेगळा व आताचा मार्ग वेगळा व नवीन होता. हे आव्हान मोठे होते. मात्र, यावर मात करीत आम्ही अखेर ही चढाई २७ जुलै रोजी पूर्ण केली; तर २७ ते १ आॅगस्ट या काळात हनुमान तिब्बा सर करण्यात आला.
खुशी म्हणाली, हनुमान तिब्बा सर केल्यानंतर खाली उतरताना हवामान बिघडले होते. त्यामुळे उतरताना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. तसेच रात्री जोरदार हिमवादळे निर्माण होत होती. या बिकट परिस्थितीत शिखर सर केल्याचा आनंद आहे.
मुंबई येथील गिर्यारोहक मेहबूब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली मी ही मोहीम पार पाडली. माझ्यासोबत शिल्पा नायर व नितीन मोरे हे दोघे मुंबईचे, सुनील ठाकूर (मनाली) व दोन गाईड आमच्यासोबत होते; तर हनुुमान तिब्बाच्या मोहिमेत अमीर नदाफ (सातारा), भालचंद्र चौधरी (ठाणे) आणि तीन गाईड सहभागी झाले होते. खुशी कोल्हापूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असून, ती नववीमध्ये शिकत आहे. (प्रतिनिधी)
आता लक्ष्य लडाख!
आता लडाख येथील नून आणि कुण ही २२०० हजार फुटांवरील शिखरे सर करण्यासाठी मी सराव करणार आहे. - खुशी कांबोज