प्रॅक्टिस, पाटाकडील(अ) ची आगेकूच महापौर चषक फुटबॉल स्पर्धा : अनुक्रमे संयुक्त जुना बुधवार, मंगळवार पेठ पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:42 AM2018-04-21T00:42:43+5:302018-04-21T00:42:43+5:30
कोल्हापूर : कैलास पाटील, राहुल पाटील, इंद्रजित चौगुले व सिद्धार्थ पाटील यांच्या उत्कृष्ट खेळीवर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)ने संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ फुटबॉल संघाचा ४-० ने, तर पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने नवख्या मंगळवार पेठ फुटबॉल क्लबचा ४-१ असा पराभव करीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील आपली घोडदौड कायम ठेवली.
शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी पहिल्या सत्रात पाटाकडील (अ) व मंगळवार पेठ फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘पाटाकडील’ संघाचेच वर्चस्व राहिले. यात ‘पाटाकडील’कडून वेगवान व खोल चढाया करण्यात आल्या. १० व्या मिनिटास ‘पाटाकडील’कडून ओंकार वैभव जाधवने पहिल्या गोलची नोंद करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर सामन्यात बरोबरी साधण्यासाठी ‘मंगळवार पेठ’कडून सोमनाथ निमक, सागर पठाडे, नीलेश खापरे, सचिन पाडळकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, भक्कम बचाव फळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. ३४ व्या मिनिटास ‘पाटाकडील’कडून रूपेश सुर्वे याने गोल करीत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. उत्तरार्धात मंगळवार पेठ संघानेही आक्रमक, वेगवान चाली रचल्या. ५४ व्या मिनिटास मिळालेल्या संधीवर मंगळवार पेठकडून नितीन पोवारने गोल करीत २-१ ने आघाडी कमी केली. यानंतर पुन्हा ६२ व्या मिनिटास रूपेश सुर्वेने संघाचा तिसरा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत ही आघाडी ३-१ ने भक्कम केली. उत्तरोत्तर खेळावर ‘पाटाकडील’चे वर्चस्व राहिले. ६५ व्या मिनिटाला ‘पाटाकडील’कडून सार्थक राऊतने गोल नोंदवत ही आघाडी ४-१ अशी केली. हीच गोलसंख्या कायम ठेवत ‘पाटाकडील (अ)’ने सामना जिंकला.
दुपारच्या सत्रात दुसरा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब व संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ फुटबॉल संघ यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांकडून वेगवान खेळाचे प्रदर्शन करण्यात आले. ‘प्रॅक्टिस’कडून १५ व्या मिनिटाला कैलास पाटीलने इंद्रजित चौगुलेच्या पासवर गोल नोंदवित संघास पहिली आघाडी मिळवून दिली. त्यानंतर राहुल पाटीलच्या पासवर पुन्हा कैलासने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फटका गोलपोस्टवरून गेला. ‘जुना बुधवार’कडून नीलेश सावेकर, कौशिक जाधव यांचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांना यश आले नाही. उत्तरार्धात ४५ व्या मिनिटास जुना बुधवारचा गोलरक्षक अभिषेक कदम पुढे आल्याची संधी साधत राहुल पाटीलने गोल केला. त्यामुळे ‘प्रॅक्टिस’कडे २-० अशी भक्कम आघाडी आली. त्यानंतर
६२ व्या मिनिटाला इंद्रजित चौगुलेने राहुल पाटीलच्या पासवर गोल करीत प्रॅक्टिस संघास ३-० अशी आघाडी मिळवून दिली. संयुक्त ‘जुना बुधवार’कडून प्रसाद पाटीलने मारलेला फटका प्रॅक्टिसचा गोलरक्षक राजीव मिरयालने डावीकडे झेपावत बाहेर काढला. त्यामुळे संयुक्त जुना बुधवारची आघाडी कमी करण्याची संधी वाया गेली. ७७ व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या सिद्धार्थ पाटीलने गोल करीत ४-० अशी आघाडी भक्कम केली. तीच कायम ठेवत
सामनाही ‘प्रॅक्टिस’ने सहज खिशात घातला.