प्रॅक्टिस ‘अ’ अंतिम फेरीत
By admin | Published: March 25, 2017 12:08 AM2017-03-25T00:08:24+5:302017-03-25T00:08:24+5:30
महापौर चषक फुटबॉल स्पर्धा : शिवाजी मंडळाचा ४-३ ने पराभव
कोल्हापूर : नव्या फुटबॉल हंगामातील चुरशीच्या सामन्यात पिछाडीवरून ३-३ अशी बरोबरी साधत प्रॅक्टिस क्लब ‘अ’ने टायब्रेकरवर शिवाजी तरुण मंडळचा पराभव करत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत प्रॅक्टिस ‘अ’ची गाठ बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’शी पडणार आहे.
शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यांत प्रारंभी शिवाजी तरुण मंडळाच्या कपिल साठे, ऋतुराज पाटील, वैभव राऊत, आकाश भोसले, निखिल जाधव यांनी आक्रमक चाली रचत प्रॅक्टिस ‘अ’वर दबाव निर्माण केला होता. यादरम्यान ‘शिवाजी’कडून कुणाल जाधवने त्यांच्या गोलक्षेत्रात चेंडू अवैधरित्या हाताळला. याबद्दल पंचांनी प्रॅक्टिस ‘अ’ला पेनल्टी बहाल केली. यावर प्रतीक बदामेने मारलेला फटका गोलपोस्टला तटून बाहेर गेला. २१ व्या मिनिटाला ‘शिवाजी’कडून निखिल जाधवने डी बाहेरून मारलेला फटका थेट गोलजाळ्यात शिरला. त्यामुळे ‘शिवाजी’कडे १-० अशी आघाडी आली. या गोलनंतर ‘प्रॅक्टिस’कडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन झाले. पूर्वार्धाच्या शेवटच्या जादा मिनिटांत ‘प्रॅक्टिस’च्या सुमित घाटगेच्या डोक्याला चेंडू लागून ‘प्रॅक्टिस’वरच स्वयंगोल झाला. त्यामुळे आपसूकच ‘शिवाजी’कडे २-० अशी आघाडी झाली. त्यानंतर ‘प्रॅक्टिस’च्या सुमित घाटगेने शेवटच्या जादा मिनिटांत या स्वयंगोलची परतफेड मैदानी गोल करत सामन्यांत २-१ अशी रंजक स्थिती निर्माण केली.
उत्तरार्धात ४५ व्या मिनिटास ‘शिवाजी’कडून वैभव राऊतच्या पासवर कपिल साठेने गोल करत ३-१ अशी भक्कम आघाडी निर्माण केली. या दरम्यान ‘प्रॅक्टिस’कडून वेगवान प्रेक्षणीय खेळाचे प्रदर्शन झाले. ६६ व्या मिनिटास ‘प्रॅक्टिस’कडून अनिकेत जोशी याने गोल करत सामना ३-२ असा उत्कंठावर्धक स्थितीत आणला. ‘शिवाजी’कडून ऋतुराज पाटील, आकाश भोसले यांनी गोल करण्याच्या अनेक संधी अखेरच्या क्षणात समन्वयाअभावी घालवल्या. ७५ व्या मिनिटास प्रॅक्टिसकडून मिळालेल्या कॉर्नर किकवर सचिन बारामती याने थेट गोल नोंदवत सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधली. अखेरपर्यंत हीच गोलसंख्या राहिल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्यात आला. त्यात ‘शिवाजी’कडून श्रेयस मोरे, आकाश भोसले,ऋतुराज पाटील ; तर ‘प्रॅक्टिस’कडून संदीप पोवार, सुमित घाटगे, इंद्रजित मोंडल, राहुल पाटील यांनी गोल नोंदविल्यामुळे सामना ‘प्रॅक्टिस’ने ४-३ असा जिंकत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सामना पाहण्यासाठी पाच हजारांहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली.
आजचा सामना
दु. ३ वा. दिलबहार ‘ब’ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ
सायं. ५:०० वा. राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस विरुद्ध ताराराणी-भाजप आघाडी नगरसेवक आणि अधिकारी प्रदर्शनीय सामना.