शिष्यवृत्तीसाठी ‘मनपा’चा सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2016 01:19 AM2016-12-31T01:19:47+5:302016-12-31T01:19:47+5:30

चार सराव परीक्षांचे आयोजन : गुणवंत यादीसाठी उपक्रम

Practice 'MNP' for scholarship | शिष्यवृत्तीसाठी ‘मनपा’चा सराव

शिष्यवृत्तीसाठी ‘मनपा’चा सराव

Next

यशवंत गव्हाणे --कोल्हापूर --राज्यात शालेय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली असून, यासाठी मनपा शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या चार सराव परीक्षा घेण्यात येणार आहेत. राज्यातील गुणवत्ता यादीत मनपा शाळेतील जास्तीस-जास्त विद्यार्थी चमकावेत, यासाठी हा सराव सुरू आहे.
राज्यात शालेयस्तरावरील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी राज्यातून पाच लाखांच्या आसपास विद्यार्थी बसतात. त्यामुळे या शिष्यवृत्ती परीक्षेस शालेय स्तरावर विशेष महत्त्व असते. संपूर्ण राज्यातून परीक्षेसाठी कसून सराव केला जातो. कट आॅफ लिस्ट लावून प्रथम येणाऱ्या एक हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. पाचवीला शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी एक हजार रुपये तीन वर्षे दिले जातात, तर आठवीच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी तीन हजार रुपये तीन वर्षे दिले जातात.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी ही परीक्षा प्रतिष्ठेची असते. आपल्या जिल्ह्यातील सर्वांत जास्त विद्यार्थी यात चमकावेत आणि जिल्ह्याचे नाव राज्यात टॉपला यावे, यासाठी सगळीकडे मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले जाते. म्हणून कोल्हापूर मनपाच्या शाळेतील काही शिक्षकांनी एकत्र येऊन यासाठी परिश्रम घेतले आहेत. शैक्षणिक पर्यवेक्षक बा. पा. कांबळे, विजय माळी व उषा सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा शाळेतील २६ शिक्षकांना यासाठी तब्बल ८०० प्रश्नांची प्रश्नपेढी तयार करून त्यावर आधारित चार चाचण्यांचे आयोजन केले आहे. ही प्रश्नपेढी एमपीएससीच्या धर्तीवर आधारित ए,बी,सी,डी प्रमाणे असणार आहे. यामध्ये खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.


‘मनपा’तर्फेही मिळणार शिष्यवृत्ती
महानगरपालिका शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी चार सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत. या सराव चाचण्यांमध्ये पहिल्या २५ विद्यार्थ्यांना पालिकेतर्फे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही सराव परीक्षा दि. ३१ डिसेंबर, २१ जानेवारी, २ फेब्रुवारी, १८ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. यासाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले असून, युद्धपातळी यंत्रणा राबवून प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत.
मनपाने परीक्षा शुल्क भरावे
जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील शिष्यवृत्तीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या निधीतून त्यांचे परीक्षा शुल्क भरले जाते. त्याचप्रमाणे जर महानगरपालिकेने त्यांचे परीक्षा शुल्क भरले तर सर्व विद्यार्थी अशा परीक्षेस बसतील आणि त्यांना स्पर्धात्मक परीक्षेची माहितीही होईल. या परीक्षेसाठी शासनाकडून खुला प्रवर्गासाठी ८० रुपये, तर राखीवसाठी २० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाते.

Web Title: Practice 'MNP' for scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.