आपली शारीरिक क्षमता लक्षात घेऊन सराव करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:04+5:302021-07-14T04:30:04+5:30
येथील कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने (केएसए) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंसाठी फिटनेस अँड स्पोर्टस् या ...
येथील कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने (केएसए) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंसाठी फिटनेस अँड स्पोर्टस् या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. त्यात १३९४ खेळाडू, प्रशिक्षक, पालक सहभागी झाले. अध्यक्षस्थानी ॲथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पोवार आणि तायक्वॉंदोेचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे होते. कोविडनंतर नव्याने सरावाला सुरुवात करताना पहिल्यांदा आपली शारीरिक क्षमता तपासावी. कारण, शरीरामधील स्नायू आकसण्यासह सहनशक्ती आणि क्षमता, गती कमी झालेली असणार, वजन कमी किंवा जास्त झालेले असणार आहे. त्यामुळे मैदानावर येताना घाई-गडबड न करता रिकव्हरी केली पाहिजे. त्यासाठी ४० ते ५० टक्के या पद्धतीने सराव करावा. सरावाचे वेळापत्रक करावे. दुखापती टाळण्यासाठी योग्य पद्धतीने वॉर्मअप, स्ट्रेचिंग, कुलडाऊन, हायड्रेशन, न्यूट्रिशन, प्रॉपर टेक्निकचा वापर करावा, असे भारतीय हॉकी संघाचे माजी फिजिओथेरिपिस्ट डॉ. संदीप चौधरी यांनी सांगितले. कोविडमुळे मानसिक, शारीरिकदृष्ट्या खेळाडूंच्यामध्ये आलेले काही नैराश्य कसे कमी करता येईल यासाठी तज्ज्ञांसमवेत संवाद साधणे गरजेचे होते. त्यामुळे केएसएने ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केल्याचे संस्थेचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी प्रास्ताविकात सांगितले. मधुरिमाराजे छत्रपती यांनी आभार मानले. प्रथमोपचारासाठी सीपीसीआर कोर्स आणि पालकांसाठी कार्यशाळा लवकर घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. केएसएचे फुटबॉल सेक्रेटरी प्रा. अमर सासने यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
आत्मविश्वास, सुसंगती वाढवा
सतरा वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप भारतीय फुटबॉल संघाचे मेंटल कंडिशनिंग अँड पिक परफॉर्मन्स प्रशिक्षक डॉ. स्वरूप सावनूर यांनी खेळाडूची मानसिकता या विषयावर संवाद साधला. कोविडमुळे सध्या खेळाडूंचे मन विचलित झाले आहे. त्याला योग्य दिशा द्यावी. मानसिकता, आत्मविश्र्वास, कामगिरीतील सुसंगती वाढविली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.