‘प्रांतकचेरी’च्या ‘वहिवाटी’स गडहिंग्लज पालिकेचा विरोध!
By admin | Published: December 27, 2014 12:26 AM2014-12-27T00:26:52+5:302014-12-27T00:33:36+5:30
मंगळवारी होणार सुनावणी : ५० वर्षांपूर्वी भाड्याने दिलेली इमारत
राम मगदूम / गडहिंग्लज : ५० वर्षांपूर्वी प्रांतकचेरी सुरू करण्यासाठी नगरपालिकेकडून भाड्याने घेतलेली धर्मशाळा इमारत व जागेस वहिवाटदार म्हणून प्रांतकचेरीचे नाव लावण्यास गडहिंग्लज पालिकेचा विरोध आहे. शहर विकास आराखड्यात व्यापारी संकुलासाठी आरक्षित ही मोक्याची जागा पालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी विनंती नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
१७ जून १९५९ रोजी तत्कालीन कलेक्टरनी म्युनिसिपालिटीचे तत्कालीन प्रेसिडेंट यांना समक्ष विनंती केली. त्यानुसार जनतेच्या सोयीसाठी होणाऱ्या प्रांत कचेरीसाठी दोन वर्षे मुदतीकरिता सर्क्युलर मिटिंगने मंजुरी घेऊन १४६ रुपये इतक्या नाममात्र भाड्याने ही इमारत देण्यात आली. मात्र, मार्च २०१५ पर्यंतचे ४०,८९८ रुपये इतके भाडे अद्याप थकीत आहे.
गडहिंग्लज बसस्थानकासमोरील सि.स.नं. १३२६ ची क्षेत्र ४७३०.५० चौ.मी. ही जागा ‘सार्वजनिक सरकारी धर्मशाळा वहिवाटदार म्युनिसिपालिटी, गडहिंग्लज’ या नावे प्रॉपर्टी कार्डावर नोंद आहे. १९६१ पासून मामलेदारांच्या कब्जेपट्टीने प्रांतकचेरीकडे वापरात आहे.
वाढत्या शहराच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी नगरपालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून याठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचे नियोजन असून, सदरची जागा परत मिळविण्यासाठी अनेक वर्षांपासून नगरपालिकेची धडपड सुरू आहे. मात्र, या जागेच्या हस्तांतरणास शासन टाळाटाळ करीत आहे.
मंगळवारी होणार सुनावणी
दोन-तीन महिन्यांपासून प्रांतकचेरीच्या जागेस ‘वहिवाटदार’ म्हणून नाव लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. अलीकडेच प्रांताधिकाऱ्यांनी या जागेची ‘मोजणी’देखील करून घेतली आहे. या जागेबाबत ‘पुनर्विलोकन’ करण्यासाठी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी (दि. ३०) सुनावणी होणार आहे.