बाजार समितीवर प्रदीप मालगावे लवाद
By admin | Published: January 7, 2015 12:46 AM2015-01-07T00:46:01+5:302015-01-08T00:04:24+5:30
वर्षानंतर अखेर नियुक्ती : चार दिवसांत प्रक्रिया सुरू; लवादामार्फत दोषी संचालकांकडून थेट वसुलीचे शस्त्र--लोकमतचा प्रभाव
राजाराम लोंढे-कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती ६४ माजी संचालकांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी ‘लवाद’ म्हणून करवीरचे साहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांची आज जिल्हा उपनिबंधकांनी नियुक्ती केली. चार दिवसांत ही प्रक्रिया सुरू केली जाणार असून गेले वर्षभर विविध कारणाने लवाद नेमणुकीचे भिजत घोंगडे पडले होते. लवादाच्या माध्यमातून दोषी संचालकांकडून थेट वसुलीच होणार असल्याने या प्रक्रियेसाठी कमालीचा दबाव होता.
समितीचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी विरोधी संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. त्यानुसार सहा वर्षांतील कामकाजाच्या चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती; तोपर्यंत तत्कालीन संचालकांनी गेल्या पंचवीस वर्षांच्या कामकाजच्या चौकशीची मागणी केली. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी कोल्हापूर शहरचे उपनिबंधक रंजन लाखे यांच्यामार्फत १९८७ च्या कारभाराची चौकशी केली. त्यामध्ये अनेक निर्णय बेकायदेशीर घेऊन समितीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला होता. यासह भूखंड वाटप, नोकरभरती या कारणांनी संचालक मंडळाच्या बरखास्तीची कारवाई जिल्हा उपनिबंधकांनी केली. समितीच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी बरखास्त संचालकांना डिसेंबर २०१३ मध्ये नोटिसा लागू केल्या. त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरही गेले वर्षभर लवाद नेमणुकीची प्रक्रिया लोंबकळत पडली होती.
याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवत पाठपुरावा केला. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधकांना धारेवर धरले होते अखेर आज प्रदीप मालगावे यांची नेमणूक करण्यात आली.
येत्या चार दिवसांत ते कामकाजास सुरुवात करणार असून ६४ माजी संचालक व अधिकाऱ्यांची सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.
सुमारे चाळीस पानी अहवालाच्या आधारे प्रदीप मालगावे ही प्रक्रिया सुरू करणार आहेत.
मालगावेंची कसोटी !
चौकशी अहवालात जिल्ह्यातील बडी धेंडे आहेत, त्यामुळेच गेले दोन वर्षे चौकशी होऊन ‘लवाद’ची प्रक्रिया रेंगाळली होती. अहवालातील ठपक्यानुसार प्रत्येकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. अनेक व्यवहार हे चुकीच्या पद्धतीने झाल्याने समितीचे मोठे नुकसान झालेले आहे. त्याच्या वसुलीची कारवाई करताना प्रदीप मालगावे यांची कसोटी लागणार आहे, पण त्यांनी बेकायदेशीर नोकरभरतीची केलेली चौकशी पाहता ते कोणाचाही दबाव न घेता कारवाई करतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.
बाजार समितीचे लवाद म्हणून माझी नेमणूक झाली आहे. चार दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असून कागदपत्रांची तपासणी, संबंधितांना नोटिसा, त्यावर सुनावणी व आरोपपत्रे ही प्रक्रिया पूर्ण करण्यास किमान चार-पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे, तरीही लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
- प्रदीप मालगावे (लवाद, बाजार समिती)