पोलीसपाटील, कोतवाल यांना लवकरच मानधनवाढ : प्रकाश आबिटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:08 AM2018-06-24T01:08:46+5:302018-06-24T01:08:53+5:30
कोल्हापूर : राज्यातील पोलीस पाटील, कोतवाल आणि आशा स्वयंसेविका यांची लवकरच मानधनवाढ होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. याबाबतचा ‘एकछत्री समिती’चा अहवाल महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आबिटकर यांनी त्यांची भेट घेतली.
आबिटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील पोलीसपाटील, कोतवाल आणि आशा स्वयंसेविका यांचे मानधन वाढवावे ही मागणी घेऊन गेल्या दोन वर्षांपासून मी शासन स्तरावर प्रयत्न करीत आहे. स्थानिक स्तरावरचे तंटे मिटविण्याचे महत्त्वाचे काम पोलीसपाटील करतात, परंतु त्यांचे मानधन नाममात्र आहे. ३१ जुलै २०१७ रोजी आझाद मैदानात पोलीस पाटील बंधूंनी आंदोलन केले. त्याहीवेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी आंदोलकांची भेट घालून देऊन चर्चा केली.
याबाबत निर्णय न झाल्याने मानधनवाढीकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली. यावेळी उत्तरामध्ये गृहराज्यमंत्री केसरकर यांनी शासन मानधनवाढ करण्यास कटिबद्ध असून, लवकरच समिती स्थापन करीत असल्याचे सांगितले.
यानुसार पोलीसपाटील, कोतवाल व आशा स्वयंसेविका यांची मानधनवाढ व विविध मागण्यांकरिता एकछत्री समितीची स्थापना केली. या समितीने आपला स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला सादर केला. हा अहवाल मुख्य सचिव डी. के. जैन, महसूलचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे पाठविला आहे.यावेळी पोलीसपाटील संघटनेचे राज्य सचिव कमलाकर मांगले, योगेश पाटील-भिवंडी, रवींद्र पवार, धनाजी खोत, अवधूत परुळेकर उपस्थित होते.
प्रस्तावावर स्वाक्षरी
२० जूनला आपण मंत्री राठोड यांची भेट घेतली असून त्यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यामुळे लवकरच या तीनही घटकांची मानधनवाढ होणार असल्याचे आमदार आबिटकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.