प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाला केंद्राचा निधी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:36+5:302021-06-03T04:17:36+5:30
संदीप बावचे जयसिंगपूर : प्रत्येकाला हक्काचे घरकूल देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. मात्र, त्या हक्काच्या ...
संदीप बावचे
जयसिंगपूर : प्रत्येकाला हक्काचे घरकूल देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. मात्र, त्या हक्काच्या घरकुलांना केंद्राच्या निधीअभावी ब्रेक लागला आहे. वर्षभरापासून जयसिंगपूर व शिरोळमधील घरकुलांना केंद्राचा ९० हजार रुपयांच्या निधीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
प्रत्येकाला हक्काचे घरकूल मिळावे, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान घरकूल योजना सुरू केली आहे. राज्य शासनाचा एक लाखाचा निधी आणि केंद्राचा दीड लाखाचा निधी असे निधीचे स्वरूप आहे. जयसिंगपूर शहरातून १५१ तर शिरोळमधून १७८ जणांना घरकूल योजना मंजूर झाल्या आहत. पहिल्या टप्प्यात केंद्राचा साठ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. राज्य शासनाने आपल्या वाट्याचा हिस्सा दिला आहे. निधी मिळाल्याने घरकुले उभारली जात असतानाच केंद्राकडून देण्यात येणारा साठ व तीस असा नव्वद हजार रुपयांचा हप्ता वर्षभरापासून मिळालेला नाही. त्यामुळे अनुदानाअभावी बांधकामे बंद ठेवण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे. पैशासाठी लाभार्थी नगरपालिकेकडे हेलपाटे मारत आहेत.
केंद्र शासनाकडून दुसरा व अंतिम हप्ता कधी मिळणार आणि घरकूल पूर्ण कधी होणार,या चिंतेत लाभार्थी सापडले आहेत. एकीकडे केंद्र शासनच योजना जाहीर करते दुसरीकडे घरकुलांचा हप्ता वेळेवर देत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे घरकूल योजनेचा निधी तातडीने उपलब्ध करण्याची मागणी लाभार्थ्यांतून केली जात आहे. दरम्यान, जयसिंगपूरमध्ये ५० तर शिरोळमध्ये ९० हून अधिक लाभार्थ्यांनी कर्जे काढून घरकुले पूर्ण केली आहेत.
......
घरकूल योजना आर्थिक संकटात
सर्वांसाठी घर संकल्पना असून चार गटात लाभार्थ्यांची निवड केली जाते. केंद्र सरकार दीड लाख व राज्य सरकारचा वाटा एक लाख रुपये असा आहे. केंद्राकडून राज्य सरकारकडे निधी सुपूर्द झाल्यानंतर अनुदानाची रक्कम म्हाडाकडे दिली जाते. जयसिंगपूर, शिरोळमधील लाभार्थ्यांना केंद्राचे अनुदान मिळावे, यासाठी म्हाडाकडे पाठपुरावा सुरू आहे. वर्षभरापासून निधी मिळाला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.