पंतप्रधान सन्मान योजना: अपात्र शेतकऱ्यांची वसुली मोहीम ठप्प, कोल्हापूर जिल्ह्यात 'इतके' शेतकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 06:22 PM2023-01-24T18:22:08+5:302023-01-24T18:22:42+5:30
अपात्र खातेदारांकडून पैसे वसूल करणे अवघड
राजाराम लोंढे
कोल्हापूर : पंतप्रधान सन्मान योजनेंतर्गत खातेदार शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. यामध्ये जिल्ह्यात २० हजार ९८५ शेतकरी अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांकडून घेतलेल्या लाभाचे पैसे वसूल करण्याचे आदेश देण्यात आले; मात्र गेल्या वर्षभरात त्यात फारसे यश आले नाही. केंद्र सरकारने या शेतकऱ्यांचा तेरावा हप्ता थांबवला असला तरी वसुलीची मोहीम ठप्पच आहे.
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम किसान’ सन्मान योजना सुरू केली. चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना पेन्शन म्हणून दिले जातात. जिल्ह्यात ५ लाख ४९ हजार ३०७ लाभार्थी होते. मात्र, यातील लाभार्थ्यांची चौकशी केली असता निकष डावलून पैसे घेणारे लाभार्थी समोर आले. यामध्ये तब्बल २० हजार ९८५ खातेदार अपात्र ठरले.
यामध्ये ज्यांच्या नावावर जमीनच नाही, पती-पत्नी दोघेही लाभ घेत आहेत, आयकर परतावा करणारे, इतर पेन्शन घेणाऱ्यांचा समावेश आहे. संबंधित खातेदारांची पेन्शन बंद करून त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्याचे आदेश केंद्र सरकारने महसूल विभागाला दिले होते. महसूल विभागाने अपात्र शेतकऱ्यांची नावे कळवूनही त्यांच्या नावावर बाराव्या हप्त्याचे पैसे आले होते. मात्र, तेराव्या हप्त्याचे पैसे संबंधितांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत.
मयत शेतकऱ्यांचे वसूल कोणाकडून करायचे?
केंद्र सरकारने अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले असले तरी खर्च झालेले पैसे वसूल करणे तितकेसे सोपे नव्हते. मुळात योजनेचा लाभ देण्यापूर्वीच सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पात्र, अपात्र ठरविणे कायद्याने अपेक्षित आहे. लाभ घेतल्यानंतर त्याला अपात्र ठरविणे व त्यांच्याकडून पैसे वसूल करणे अडचणीचे ठरू शकते. त्यात काही लाभार्थी मयत आहेत, ते पैसे कोणाकडून वसूल करायचे, असा प्रश्न आहे.
महसूल विभागाने नाक दाबण्याची गरज
अपात्र खातेदारांकडून पैसे वसूल करणे अवघड आहे. ज्यांना एका हप्त्यात परत करता येत नसतील तर टप्पे पाडून ती रक्कम वसूल केली पाहिजे. ज्यांना शक्य आहे, पण भरायची मानसिकता नाही, त्यांचे नाक दाबण्याची गरज आहे.
आयकर दात्यांकडून २.४० कोटी वसूल
गेल्या दीड वर्षात आयकरदात्या लाभार्थ्यांकडून बऱ्यापैकी वसुली झाली आहे. जिल्ह्यात २,३७१ आयकर भरणारे खातेदार होते. त्यांच्याकडून २ कोटी ४० लाखांची वसुली झाली आहे.
दुहेरी लाभार्थ्यांची पाठ
केंद्र सरकारच्या या योजनेनुसार एका कुटुंबातील एकालाच लाभ घेता येतो. मात्र, पती व पत्नी दोघांनीही लाभ घेतला आहे. जिल्ह्यात असे १७०० खातेदार आहेत. त्यांच्याकडून एक रुपयाही वसूल झालेला नाही.
तालुकानिहाय अपात्र खातेदार असे -
तालुका - अपात्र खातेदार
करवीर - २७८०
कागल - २३६०
राधानगरी - ३२००
शाहूवाडी - १७२०
पन्हाळा - २२००
गगनबावडा - ७००
भुदरगड - १९३०
शिरोळ - १४८०
हातकणंगले - ११३०
गडहिंग्लज - १४३२
आजरा - १०७७
चंदगड - ९७६