प्रल्हाद चव्हाण, बाळासाहेब कुंभार पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:43 AM2017-08-07T00:43:19+5:302017-08-07T00:43:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार) निवडणुकीत ‘देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विकास आघाडी’चे नेते माजी महापौर प्रल्हाद चव्हाण व बाळासाहेब कुंभार यांना पराभवाची चव चाखावी लागली. आघाडीचे दुसरे नेते व माजी उपमहापौर उदय पोवार, प्रकाशराव बोंद्रे यांनी बझारवर पुन्हा वर्चस्व राखले आहे. पोवार यांची खेळी यशस्वी झाल्याने चार अपक्षांनी बाजी मारली.
जनता बझारची निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत राहिली. पात्र-अपात्र नाट्यानंतर पॅनेल बांधणीतील बेबनावामुळे तर मतदानापर्यंत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. उदय पोवार, प्रकाशराव बोंद्रे व प्रल्हाद चव्हाण, बाळासाहेब कुंभार यांनी स्वतंत्र पॅनेल बांधणी केली होती. माघारीनंतर ऐनवेळी पोवार, बोंद्रे, चव्हाण व कुंभार यांनी एकत्रित येत ‘कुंभार विकास आघाडी’ची घोषणा केली. आघाडी बांधली; पण प्रचारात कोठेही एकसंधपणा दिसला नाही.
रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून देशभूषण हायस्कूल येथे सहा केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. सर्वसाधारण गटात २,२७९ पैकी केवळ ८४३ मतदान (३६.९८ टक्के) झाले. ‘क’ वर्ग गटात १६ पैकी १५, ‘ब’, ‘ड’ व ‘ई’ गटांत १३ मते झाली. दुपारी साडेचारनंतर मतमोजणीस सुरुवात झाली. यामध्ये सर्वसाधारण गटात प्रल्हाद चव्हाण व बाळासाहेब कुंभार या दोन कुंभार आघाडीच्या नेत्यांना, तर मधुकर चित्रूक यांना पराभव पत्करावा लागला. या गटात बिपेन जाजू, आकाराम पाटील व वैभव पोवार विजयी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी टी. बी. बल्लाळ, मिलिंद ओतारी, नितीन माने, सचिन कामिरे, उदय उलपे यांनी निवडणुकीचे काम पाहिले.
गटनिहाय विजयी उमेदवार असे, कंसात मते
सर्वसाधारण : उदयकुमार देसाई (५७५), शिवाजी घाटगे (५६२), दीपक शिराळे (५६०), अरुण साळुंखे (५४४), उदय भोपळे (५३८), वैभव पोवार (३८४), आकाराम पाटील (३६२), बिपेन जाजू (३३५).
‘ब’ वर्ग - प्रकाशराव बोंद्रे (१३).
‘क’ वर्ग - रमेश उलपे (८).
‘ड’, ‘ई’- उदय पोवार (९), सुहास बोंद्रे (९), तृप्ती शिंदे (८), मधुकर शिंदे (८).
महिला - विद्या माळी (५७९), ललिता माळी (५७१).
इतर मागासवर्गीय - मदन चोडणकर (५९८).
भटक्या विमुक्त जाती - तानाजी साजणीकर (६२७).
अनुसूचित जाती - रविकिरण चौगुले (६३८).
पती-पत्नी, पिता-पुत्र सभागृहात
उदय पोवार यांचे सुपुत्र वैभव सर्वसाधारण गटातून अपक्ष म्हणून निवडून आले, तर ‘ड’, ‘ई’ गटातून मधुकर शिंदे व तृप्ती शिंदे हे पती-पत्नी विजयी झाले. तसेच प्रकाशराव बोंद्रे ‘ब’ गटातून, तर त्यांचे सुपुत्र सुहास ‘ड’, ‘ई’ गटातून विजयी झाले.
भूमिका नडली!
प्रल्हाद चव्हाण व त्यांचे सुपुत्र सचिन चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आघाडीत नाराजी होती. त्याचा राग मतांद्वारे व्यक्त केल्याची चर्चा होती.
निकराची झुंज
‘क’ वर्ग गटात केवळ १५ मते होती. आघाडीचे प्रकाश खुडे व अपक्ष रमेश उलपे यांच्यात निकराची झुंज झाली. एका मताने उलपे विजयी झाले.