मुख्यमंत्र्यांचे कौतुक राहू द्या, किमान अपशकुन तरी करू नका : मुश्रीफ यांचा भाजपला टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:27 PM2020-07-27T17:27:44+5:302020-07-27T17:30:12+5:30
मुख्यमंत्र्यांचे कौतुक राहू द्या, किमान वाढदिनी अपशकुन तरी करू नका, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी भाजपला लगावला.
कोल्हापूर : भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. वास्तविक, एखाद्या व्यक्तीच्या वाढदिनी शुभेच्छा देण्याची परंपरा या महाराष्ट्राची आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे कौतुक राहू द्या, किमान वाढदिनी अपशकुन तरी करू नका, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी भाजपला लगावला.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेच कोरोनाचे संकट आले, अशा परिस्थितीत प्रशासनाचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना एवढ्या कमी वेळेत कोरोनाशी यशस्वी दोन हात करीत आहेत. खरंतर आजच्या वाढदिनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संयमी, सुसंस्कृत आणि प्रांजळ स्वभावाचं कौतुक व्हायला हवं होतं. परंतु; ते राहिल बाजूलाच. त्यांच्यावर तोंडसुख घेऊन त्यांना अपशकुन घडविण्यासाठी भाजपने ही कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यांच्या या घाणेरड्या प्रयत्नाबद्दल आम्ही निषेध करतो.
कोरोना महामारीचे संकट उद्भवले आहे. त्यामुळे सगळेच कारखाने गेली चार-पाच महिने बंद आहेत. त्यामुळे आमच्या सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील काळात असं काही नव्हतं, अशी हास्यास्पद विधाने तरी करू नका.
सरकार पडायची तर वाट बघा, किमान एवढा तरी शहाणपणा शिल्लक ठेवा
महाराष्ट्रातील सरकार आम्ही पाडणार नाही. महाविकास आघाडीतील पक्षांच्या अंतर्गत विरोधामुळे सरकार पडेल, असाही दावा देवेंद्र फडणवीस हे करीत आहेत. तर मग माझा त्यांना सल्ला आहे, की शांत राहून आमच्यातील अंतर्गत विरोधामुळे सरकार पडायची तर वाट बघा. किमान एवढा तरी शहाणपणा शिल्लक ठेवा, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.