कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीला कौतुकाची थाप
By admin | Published: September 14, 2016 01:11 AM2016-09-14T01:11:47+5:302016-09-14T01:15:23+5:30
लोकमत ‘नंबर वन फूड अवॉर्ड’चे शानदार वितरण : शिव मिसळ, दीपक वडा, नेहा दाबेली, खवय्या, केट्री, वेलची, रेस्टो, कावा, महालक्ष्मी गृहोद्योगला पुरस्कार
कोल्हापूर : ‘कोल्हापूर म्हणजे अस्सल खवय्यांचे गाव’. येथील विविध शाकाहारी पदार्थांची चव आणि खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचविणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंटना सोमवारी ‘लोकमत नंबर वन फूड अवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. खाद्य क्षेत्रात पहिल्यांदाच देण्यात आलेल्या या पुरस्कारांनी कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीलाच कौतुकाची थाप दिली.
‘लोकमत’च्यावतीने आयोजित ‘नंबर वन फूड अवॉर्ड’ पुरस्काराचे वितरण सोमवारी राजारामपुरी व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे झाले. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर उपस्थित होते.
व्यासपीठावर ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले उपस्थित होते. यावेळी ‘थाळी’, ‘मिसळ’, ‘लोकप्रिय हॉटेल’, ‘पंजाबी’, ‘चायनीज’, ‘फास्टफूड’ आणि
ज्युरी या सात विभागांमध्ये पुरस्कार देण्यात आले.
यावेळी विष्णू मनोहर यांनी शेफ म्हणून आपला झालेला प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला. ते म्हणाले, माझे वडील चित्रकार, आई किराणा घराण्याची गायिका आणि मी फाईन आर्ट झालेला विद्यार्थी. खाद्यसंस्कृती या क्षेत्रात मी अपघातानेच आलो. जेवण बनविता येत नव्हते म्हणून
विविध खाद्यपदार्थांच्या गाड्यांशेजारी उभा राहून रेसिपी शिकलो. तेथून
माझा प्रवास सुरू झाला. या आवडीतूनच खाद्यपदार्थांवर पुस्तक लिहून लेखक झालो. आता शिवकालीन खाद्यसंस्कृतीवर मालिका करीत आहे. प्रास्ताविकात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, पाककृती हे एक शास्त्र आहे. कंदमुळापासून सुरू झालेला प्रवास आता सीझनिंग फूडपर्यंत येऊन पोहोचला आहे. कोल्हापूरला मोठी खाद्यसंस्कृती लाभली आहे. ‘लोकमत नंबर वन फूड अवॉर्ड’ पुरस्कारांच्या निमित्ताने या खाद्यसंस्कृतीला व्यासपीठ मिळाले आहे.
‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख म्हणाले, ‘लोकमत’च्या सखी मंच, बाल विकास मंच, युवा नेक्स्टच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण केले आहे. या ‘नंबर वन फूड अवॉर्ड’च्यानिमित्ताने कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचे वैविध्य प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात १३५ रेस्टॉरंटने सहभाग घेतला. त्यातील विविध प्रकारांत ३० रेस्टॉरंटची निवड करण्यात आली. त्यातून ६ कॅटॅगरीतून एक विजेता घोषित करण्यात आला.
यावेळी स्पर्धेतील सहभागी हॉटेल व रेस्टॉरंटच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र देण्यात आले. परीक्षक म्हणून शेफ विष्णू मनोहर, जिशांत खान, प्राजक्ता शहापूरकर यांनी काम पाहिले. सुखदा आठले यांनी विष्णू मनोहर यांच्याशी संवाद साधला. (प्रतिनिधी)
खाद्यसंस्कृतीला
कमी लेखू नका
विष्णू मनोहर म्हणाले, एखाद्याला करिअर करता आले नाही की त्याला हॉटेलिंग क्षेत्रात आणले जाते; पण या क्षेत्राला कमी लेखू नका. ‘कुक’ हा संवेदनशील, विचारवंत, टेक्निशियन, विज्ञानाचे ज्ञान असलेला कलाकार असतो. या पाच भूमिकांमधून तो खाद्यपदार्थ आपल्यासमोर आणतो. तुम्ही बनविलेला पदार्थ नवीन खाद्यपरंपरा निर्माण करतो. आपल्या क्षेत्रात आवडीने काम करा, संधीचा फायदा घ्या.
पहिले सादरीकरण ‘लोकमत सखी मंच’मध्येच
विष्णू मनोहर यांनी आपल्या शेफ म्हणून सुरू झालेल्या प्रवासात पहिले योगदान लोकमत ‘सखी मंच’चे असल्याचे सांगितले. ‘सखी मंच’च्या एका कार्यक्रमात त्यांचा ‘रेसिपी शो’ झाला. त्यानंतर आजतागायत तीन हजार २०० टीव्ही शो सादर केले. यावेळी त्यांनी ‘लोकमत’च्या ‘नंबर वन फूड अवॉर्ड’ या अनोख्या स्पर्धेबद्दलही ‘लोकमत’चे अभिनंदन केले.
पीठल्याने केली सुटका..
यावेळी मनोहर यांनी कवी सुरेश भट यांची ‘मरणाने केली सुटका’ ही कविता आपल्या ‘खवय्या स्टाईल’मध्ये सादर केली. डाळींच्या वाढलेल्या दराचा संदर्भ घेत त्यांनी ‘पीठल्याने केली सुटका, वरणाने छळले होते’ ही ओळ सादर केली, तसेच डायटिंग या प्रकारावर वि. वा. शिरवाडकरांचा ‘जगावे की मरावे’ हा प्रसिद्ध संवाद ‘खावं की की खाऊ नये हा एकच सवाल आहे’ या शब्दांत सादर केला.