Kolhapur: प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके यांना शिंदेसेनेची उमेदवारी जाहीर; राजेश क्षीरसागर वेटिंगवरच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:22 PM2024-10-23T12:22:31+5:302024-10-23T12:23:10+5:30
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत राधानगरी -भुदरगड मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर व करवीर मतदारसंघातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना ...
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर व करवीर मतदारसंघातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना शिंदेसेनेने (एकनाथ शिंदे गट) मंगळवारी उमेदवारी जाहीर केली. शिंदेसेनेने रात्री उशिरा राज्यातील ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात आबिटकर व नरके यांचा समावेश आहे.
राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून प्रकाश आबिटकर हे सन २०१४ व २०१९ असे सलग दोनवेळा शिवसेनेकडून निवडून गेले आहेत. शिवसेना फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत सत्तेत जाणे पसंत केले. त्याची बक्षिसी म्हणून त्यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली आहे. आबिटकर हे आतापर्यंत तीन विधानसभेच्या निवडणुका लढले आहेत. २००९ च्या निवडणुकीत ते अपक्ष रिंगणात होते. मात्र, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, पुढे सलग दोनवेळा त्यांनी गुलाल घेतला आहे. यंदा ते चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत.
दुसरीकडे करवीर विधानसभा मतदारसंघातून चंद्रदीप नरके हे शिंदेसेनेकडून रिंगणात उतरणार आहेत. नरके हे २००९ व २०१४ असे दोनवेळा या मतदारसंघांतून विधानसभेवर गेले आहेत. गतनिवडणुकीत काँग्रेसचे स्व. आमदार पी. एन. पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी त्यांची जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे राहुल पाटील यांच्याविरोधात लढत होणार आहे.
राजेश क्षीरसागर वेटिंगवरच
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेकडून आपणालाच उमेदवारी मिळाल्याचा दावा करणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे नाव शिंदेसेनेच्या पहिल्या यादीत जाहीर झालेले नाही. या मतदारसंघावर भाजपने आक्रमकपणे दावा केला आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक, सत्यजित कदम यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे सध्यातरी शिंदेसेनेने क्षीरसागर यांना उमेदवारीसाठी वेटिंगवरच ठेवले आहे. पहिल्या यादीत नाव न आल्याने उत्तर मतदारसंघ शिंदेसेनेला की भाजपला याची उत्सुकता अधिक ताणली आहे.