तावडेंनी वादात तेल ओतले, प्रकाश आंबेडरांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 05:07 AM2018-05-09T05:07:16+5:302018-05-09T05:07:16+5:30
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा जसा बट्ट्याबोळ केला, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचे होणार आहे. ‘टिस’च्या समितीची मानसिकता पाहता, हे सरकार गेल्यानंतरच अहवाल येण्याची शक्यता असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
कोल्हापूर - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा जसा बट्ट्याबोळ केला, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचे होणार आहे. ‘टिस’च्या समितीची मानसिकता पाहता, हे सरकार गेल्यानंतरच अहवाल येण्याची शक्यता असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
सोलापूर विद्यापीठ नामांतरप्रश्नी धनगर व लिंगायत समाजांत सरकारने वाद निर्माण केला असून, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यात तेल ओतण्याचे काम केल्याची टीकाही त्यांनी केली.
अॅड.आंबेडकर म्हणाले, कॉँग्रेसने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला. त्यामुळे या समाजाने भाजपला पाठबळ दिले; पण त्यांनीही फसवणूक केली आहे.
आता ‘टिस‘ (टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स) या संस्थेतर्फे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. यासाठी समितीचे काम सुरू असतानाच मंत्री विनोद तावडे यांनी आहिल्यादेवींचे नाव दिले तर दंगल उसळेल, असे वक्तव्य केले.
त्यानंतर, समिती सदस्यांनी बसवेश्वरांचे नाव पुढे केले. धनगर व लिंगायत समाजांत वाद निर्माण करायचा आणि आपली सत्ता अबाधित ठेवण्याचे राजकारण भाजप करीत आहे. अहिल्यादेवींचे कार्य साऱ्या महाराष्टÑाला माहिती आहे. त्यांच्या नावावर वादंग उठणेच अशक्य आहे.
या वादावर पडदा टाकायचा झाल्यास तावडेंनी माफी मागायला हवी, असे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.
पंढरपुरात २० मे रोजी ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’
आलुतेदार-बलुतेदारांना एकत्र करून सत्ता हस्तगत करायची आणि सत्तेच्या माध्यमातूनच आपले प्रश्न मार्गी लावायचे आहेत, त्यासाठी २० मे रोजी पंढरपुरात सत्ता संपादन निर्धार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहितीही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.