प्रकाशआण्णा राग करू नका, माझ्याशी संपर्क साधा : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:12+5:302021-06-05T04:17:12+5:30
कोल्हापूर : सीपीआरच्या धर्तीवर इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात सेवा लवकरच सुरू होतील, मात्र प्रकाशआण्णा आवाडे यांनी रागावू नये, कोणत्याही समस्येला ...
कोल्हापूर : सीपीआरच्या धर्तीवर इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात सेवा लवकरच सुरू होतील, मात्र प्रकाशआण्णा आवाडे यांनी रागावू नये, कोणत्याही समस्येला थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालय अद्ययावत करण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? अशी विचारणा आमदार प्रकाश आवाडे यांनी केली होती. त्याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘आयजीएम’ रुग्णालयाला आपण व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी १५ मे रोजी भेट दिली. त्यावेळी सीटी स्कॅन तत्काळ मंजूर करू व बेड वाढवून देण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर २४ मे रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक झाली आणि त्यास तत्वत: मान्यता घेतली. रीतसर प्रस्ताव दाखल झाल्यानंतर आरोग्य व वित्त विभागाने तत्काळ मान्यता देण्याचेे मान्य केले. ५० बेड वाढ व सीटी स्कॅनचे टेंडर निघाले आहे. सहा निविदाधारकांनी प्रतिसाद दिला आहे. खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. सीटी स्कॅन आम्ही जेव्हा बसवू, त्यावेळी तेथील विधानसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रकाश आवाडे हे उपस्थित असतीलच. या दोन गोष्टींना तातडीने मान्यता मिळवून दिली. प्रकाश आवाडे हे अनेक वर्षे प्रशासनात काम करत आहेत, त्यामुळे अशा कामांना किती वेळ लागतो, याची जाणीव त्यांना असावी, असे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
यंत्रमाग कामगारांचे लवकरच महामंडळ
यंत्रमाग कामगारांच्या समस्यांसाठी भाजपच्या काळात नेमलेल्या समितीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी अहवाल दिलेला आहे. कामगार मंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे येऊन अवघा एक महिना झालेला आहे. यंत्रमागधारकांचे महामंडळ करावी, अशी मागणी काँग्रेसचे शशिकांत बावचकर व राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांनी केलेली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.