प्रकाश आवाडे हेच जिल्हाध्यक्ष व्हावेत
By admin | Published: April 19, 2016 11:42 PM2016-04-19T23:42:09+5:302016-04-20T00:43:21+5:30
सतेज पाटील : काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचे राजकारण; जिल्हा काँग्रेस एकसंघ राहावी
इचलकरंजी : कॉँग्रेस जिल्हाध्यक्षपदाच्या वादातून जिल्ह्यातील कॉँग्रेसमध्ये फूट पडू नये, ती एकसंघ राहावी, यासाठी जाणीवपूर्वक आपण समन्वयाची भूमिका घेतली आहे. प्रकाश आवाडे हेच कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हावेत, अशी माझी भूमिका आहे. त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी माझे यापूर्वी बोलणे झाले होते. आवाडे जिल्हाध्यक्ष व्हावेत, यासाठी मी स्वत: त्यांना घेऊन दोन-तीन दिवसांत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना भेटणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून पी. एन. पाटील यांची निवड होताच त्याचे पडसाद इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यांत उमटले. आवाडेंना त्याचे ‘मेरीट’ असूनसुद्धा जिल्ह्याच्या राजकारणात डावलले जात असल्याबद्दल कार्यकर्ते संतप्त झाले. आवाडेंनी बंडखोरी करावी, यासाठी जनमताचा रेटा वाढत असतानाच इचलकरंजीत शनिवारी (दि. २३) कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याची घोषणा झाली. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी आमदार पाटील हे आवाडेंच्या निवासस्थानी पिता-पुत्रांची भेट घेण्यासाठी आले होते.
आमदार पाटील यांची आवाडे पिता-पुत्रांसह इचलकरंजीतील कॉँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आवाडे यांना जिल्हाध्यक्ष करण्याची स्पष्ट भूमिका विधानपरिषद निवडणुकीनंतर आपण प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे मांडली होती. आता जरी पी. एन. पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असली तरी ते ‘प्रभारी’ आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी आवाडेंना जिल्हाध्यक्ष करावे, म्हणून मी पक्षश्रेष्ठींबरोबर दूरध्वनीवरून बोललो आहे. त्यांनी सांगितल्यामुळेच आवाडे पिता-पुत्रांची मी भेट घेतली.
यावेळी अहमद मुजावर, कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, नगरसेवक शशांक बावचकर, प्रदेश कॉँग्रेसचे चिटणीस प्रकाश सातपुते, युवक कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अमृत भोसले, शहर उपाध्यक्ष विलास गाताडे, पक्षप्रतोद सुनील पाटील, गटनेते बाळासाहेब कलागते, सभापती दिलीप झोळ, प्रा. शेखर शहा, जनता बॅँकेचे अध्यक्ष अशोकराव सौंदत्तीकर, माजी नगराध्यक्ष अशोक आरगे, आदींसह कॉँग्रेस व युवक कॉँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्र्रतिनिधी)
‘पी.एन.’ यांच्या भूमिकेवर टीका
विधानपरिषद निवडणुकीबाबत आमदार पाटील म्हणाले, या निवडणुकीत एक व्यक्ती सोडून कॉँग्रेसमधील सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करून मला निवडून आणले. त्यामध्ये आवाडे पिता-पुत्रांचा सिंहाचा वाटा आहे, असे सांगत असतानाच पी. एन. पाटील यांचे नाव न घेता टीका केली.
काँग्रेस मेळाव्याबाबत आज भूमिका जाहीर करु : आवाडे
मी व प्रकाश आवाडे दोघेजण कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना दिल्ली किंवा मुंबई येथे येत्या दोन-तीन दिवसांत भेटणार आहोत. त्यांच्याकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असल्यामुळे इचलकरंजी शहर कॉँग्रेसने शनिवारी आयोजित केलेला कार्यकर्त्यांचा मेळावा पुढे ढकलावा, अशी विनंती आपण केली आहे, अशीही माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांना दिली.
यावर बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, मंगळवारी रात्री कॉँग्रेसची शहर कार्यकारिणी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आहे.
ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठकीत होणारा निर्णय आज, बुधवारी जाहीर केला जाईल. मेळाव्याबाबतची नवीन भूमिका आजच जाहीर होईल.
इचलकरंजीतील आवाडे यांच्या निवासस्थानी मंगळवारी आमदार सतेज पाटील यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी अहमद मुजावर, प्रकाश मोरे, शशांक बावचकर, प्रकाश सातपुते, अमृत भोसले, विलास गाताडे, सुनील पाटील, शेखर शहा, अशोकराव सौंदत्तीकर, अशोक आरगे, आदी उपस्थित होते.