प्रकाश आवाडे येत्या मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली माहिती
By समीर देशपांडे | Updated: April 13, 2024 19:09 IST2024-04-13T19:08:12+5:302024-04-13T19:09:07+5:30
कोल्हापूर : भाजपाला पाठिंबा दिलेले इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी येथे दुपारी भेट घेतली. ...

प्रकाश आवाडे येत्या मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली माहिती
कोल्हापूर : भाजपाला पाठिंबा दिलेले इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी येथे दुपारी भेट घेतली. परंतु आपली जरी त्यांच्याशी चर्चा झाली असली तरी मंगळवारी १६ एप्रिल रोजी आपण अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आवाडे यांच्या या भूमिकेवर भाजपकडून अजूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांशी सुमारे दोन तास कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करून त्यांना काही सूचना दिल्या. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह महायुतीचे दोन्ही उमेदवार आणि आमदार उपस्थित होते. अजूनही दोन्ही मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना ते भेटत असून यानंतर महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. त्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे हे मुंबईला रवाना होणार आहेत. दरम्यान थोड्या वेळातच ते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या घरी भेट देणार आहेत.