प्रकाशोत्सव रंगणार सहा दिवस, रविवारपासून प्रारंभ : तयारीला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:01 PM2018-11-02T12:01:36+5:302018-11-02T12:06:17+5:30
दिवाळी म्हणजे नावीन्य, प्रकाश, लक्ष-लक्ष तेजाचा उत्साह, आनंदाचा सण. मराठी पंचांगानुसार वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीचा तेजोत्सव यंदा सहा दिवस रंगणार आहे. मुख्य सण सहा दिवस असला तरी तुळशी विवाहापर्यंत त्याचा जल्लोष सुरू राहणार आहे.
कोल्हापूर : दिवाळी म्हणजे नावीन्य, प्रकाश, लक्ष-लक्ष तेजाचा उत्साह, आनंदाचा सण. मराठी पंचांगानुसार वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीचा तेजोत्सव यंदा सहा दिवस रंगणार आहे. मुख्य सण सहा दिवस असला तरी तुळशी विवाहापर्यंत त्याचा जल्लोष सुरू राहणार आहे.
यंदा अधिक महिन्यामुळे दरवर्षी आॅक्टोबरमध्ये साजरी होणारी दिवाळी नोव्हेंबरमध्ये आली आहे. वर्षभर सणाच्या आगमनाची उत्सुकता आणि तयारीला आता वेग आला आहे. घरोघरी फराळाचा घमघमाट सुटला आहे. एकीकडे आकाशकंदिलांची, दुसरीकडे आबालवृद्धांसाठीच्या कपड्यांची खरेदी सुरू आहे. शहरातील मोठ्या मैदानांवर फटाक्यांचे स्टॉल्स लागले आहेत. रांगोळीच्या रंगांनी महाद्वार रोड, महापालिका चौक रंगला आहे. याशिवाय घराच्या सजावटीचे भरपूर साहित्य बाजारपेठेत आले आहे.
दिवाळीचा मुख्य सोहळा नरकचतुर्दशीपासून सुरू होत असला तरी वसुबारसने त्याची सुरुवात होते. यंदा वसुबारस ते भाऊबीजेपर्यंतचा हा दिवाळीचा सोहळा सहा दिवस रंगणार आहे.
वसुबारस : यंदा वसुबारस रविवारी (दि. ४) असून या दिवशी शेतकऱ्यांचा सखा असलेल्या गाय, बैल, म्हैस या मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी गाय-बैलांना न्हाऊ-माखू घालून छान तयार केले जाते. त्यांचे औक्षण करून गोडधोड खायला दिले जाते.
धनत्रयोदशी, यमदीपदान (दि. ५) : धनत्रयोदशी दिवशी व्यापारी नवीन वही घालतात. या दिवशी सूर्योदयापासून सकाळी ८ आजून ७ मिनिटांनी अमृत, साडेनऊ ते १० वाजून ५७ मिनिटे या वेळेत शुभ व दुपारी सव्वातीन ते सायंकाळी सहा या वेळेत अमृत मुहूर्त आहे. या वेळेत व्यापारी वही आणता येईल. या दिवशी आरोग्यदेवता धन्वंतरी जयंती असल्याने डॉक्टर, मेडिकल, केमिस्ट अशा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती धन्वंतरीचे पूजन करतात. काही घरांमध्ये धण्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवून पूजन केले जाते. याच दिवशी यमदीपदान असून, सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्याची पद्धत आहे. असे केल्याने कुटुंबात अकाली मृत्यूचे संकट येत नाही, अशी श्रद्धा आहे.
नरकचतुर्दशी (दि. ६) : दिवाळीची खºया अर्थाने सुरुवात होते, ती या दिवसापासून. या दिवशी पहाटे उटणे, सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान केले जाते. कुटुंबातील मुले, पुरुषांना अंघोळ घालून औैक्षण केले जाते व कुटुंबीय एकत्रित फराळाचा आनंद घेतात.
लक्ष्मी-कुबेर पूजन (दि. ७) : दीपोत्सवातील हा चौथा दिवस असून या दिवशी अमावास्येचा योग साधून सायंकाळी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. या दिवशी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेत प्रदोषकाळ असून या कालावधीत लक्ष्मीपूजन करता येईल. या दिवशीच वहीपूजनही केले जाते.
बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा (दि. ८) : या दिवशी सुवासिनी पतीचे औक्षण करतात. हा दिवस वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून या मुहूर्तावर केलेली खरेदी अथवा कार्य शुभ मानले जाते. घरात सुख-समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे वर्षभर बचतीतून जमा केलेला पैसा या दिवशीच्या खरेदीसाठी वापरला जातो.
भाऊबीज (दि. ९) : भावा-बहिणीच्या नात्याप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करणाºया या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते. पंचपक्वानांचे जेवण होते.
सहा दिवसांच्या उत्सवानंतर २० तारखेला तुलसीविवाह आहे. या दिवशी तुळशीचे लग्न लावले जाते; तर २२ तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा असून, या दिवशी दिवे लावल्यानंतर दीपावली उत्सवाची सांगता होते.