‘वैभव’ कलापथकाचे प्रकाश हिलगे यांचे निधन
By admin | Published: June 25, 2014 01:11 AM2014-06-25T01:11:46+5:302014-06-25T01:13:49+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक, अभिनेता, निर्माता
कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक, अभिनेता, निर्माता व वैभव कलापथकाचे गाजलेले कलाकार प्रकाश महादेव हिलगे (वय ५९) यांचे आज, मंगळवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने कोल्हापुरातील आझाद गल्लीतील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, भावजय, चार विवाहित बहिणी, पुतणे असा बराच मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी सकाळी नऊ वाजता आहे.
हिलगे बंधू मूळचे करवीर तालुक्यातील कसबा बीडचे. शालेय वयातच प्रकाश हिलगे यांनी किरण मेळा, विश्वभारती संगीत मेळा, अंकित मेळ्यात काम करून आपल्यातील कलाकाराची ओळख करून दिली. भाऊ सुभाष हिलगे, अनिल हिलगे यांच्यासह त्यांनी १९६८ मध्ये ‘वैभव कलादरबार’ची स्थापना केली. महाराष्ट्रात या वैभव कलादरबारचे कार्यक्रम होत असत. प्रकाश हिलगे या नावांवरच तो कार्यक्रम चालत असे. तो पाहण्यासाठी तरुणाईच्या उड्या पडत. त्यांनी महाराष्ट्रात, कर्नाटक, तमिळनाडू ,केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश येथे दहा हजारांहून अधिक स्टेज शो केले. प्रकाश हिलगे यांच्या चॅलेंजिंग थाळीनृत्य व समईनृत्याची ख्याती सर्वत्र होती. एकेकाळी महाराष्ट्रात विठाबाई भाऊ मांग, काळूबाळू यांचा तमाशा व हिलगे बंधूंचे वैभव कलापथक याची मोठी क्रेझ होती.
हिलगे यांनी २००१ मध्ये वैभव मराठी चित्रपट संस्था काढली. या संस्थेद्वारे त्यांनी ‘माहेरची पाहुणी’ चित्रपट निर्मिती केली. महाराष्ट्र चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला तीन पारितोषिके मिळाली. त्यांनी ‘भाजीवाली सखू, हवालदार भिकू’ हा विनोदी चित्रपटही निर्माण केला.