प्रणव झुटाळचे अभियंता बनण्याचे स्वप्न साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:27 AM2021-09-24T04:27:48+5:302021-09-24T04:27:48+5:30
* घेतले दत्तक अन् दिला पदविकेला प्रवेश यड्राव : आपत्कालीन परिस्थितीत मदत करताना मृत्यू पावलेल्या प्रदीप झुटाळ यांचा पितृछत्र ...
* घेतले दत्तक अन् दिला पदविकेला प्रवेश
यड्राव : आपत्कालीन परिस्थितीत मदत करताना मृत्यू पावलेल्या प्रदीप झुटाळ यांचा पितृछत्र हरपलेला मुलगा प्रणवची शैक्षणिक जबाबदारी घेऊन शरद पॉलिटेक्निकमध्ये अभियांत्रिकी पदविकेला प्रवेश दिला. त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा दिलेला शब्द आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पाळल्याने त्याचे अभियंता बनण्याचे स्वप्न साकारणार आहे.
चार वर्षांपूर्वी नांदणी येथे विहिरीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढत असताना श्वास गुदमरून प्रदीप शिवाजी झुटाळ (रा. टाकवडे) यांचा मृत्यू झाला होता. आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यास नेहमीच अग्रेसर असणाऱ्या झुटाळ यांची मुले निराधार बनली होती. अत्यल्प शेती व अंगणवाडीत सेविका असणारी त्यांच्या पत्नीवर मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पडली. त्यावेळी सांत्वनासाठी गेलेले राज्यमंत्री यड्रावकर यांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार प्रणव दहावी पास झाल्यानंतर त्याला शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टकडून शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. दत्तक घेतल्याचे पत्र राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते प्रणव झुटाळ याला देण्यात आले.
प्रणवच्या इच्छेनुसार शरद पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगला त्यास प्रवेश दिला. त्याच्या तिन्ही वर्षांचा शिक्षणाचा व प्रवासाचा संपूर्ण खर्च ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे पितृछत्र हरपलेल्या प्रणव झुटाळच्या शिक्षणाचा प्रश्न आरोग्यमंत्री यड्रावकर यांनी सोडविला आहे.
कोट : प्रणव झुटाळच्या वडिलांनी आपत्कालीन परिस्थितीत मदत करताना जीव गमावल्याने त्यांची मुले अनाथ झाली. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली आहे. समाजातील गरीब व होतकरू मुलांना नेहमीच संस्थेमार्फत शिष्यवृत्ती देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते.
- राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर
कोट - वडिलांच्या निधनानंतर आम्हास मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. मात्र, मंत्री यड्रावकर यांनी मला दत्तक घेतल्यामुळे मला अभियांत्रिकीचे शिक्षण घेता येणार आहे.
- प्रणव झुटाळ
फोटो - २३०९२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथे प्रणव झुटाळ यास शिक्षणासाठी दत्तक घेतल्याचे पत्र आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले. यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे उपस्थित होते.