प्रशांत कोरटकरची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी, संतप्त शिवप्रेमींना चकवा देत न्यायालयात केले हजर
By उद्धव गोडसे | Updated: March 25, 2025 14:39 IST2025-03-25T14:38:39+5:302025-03-25T14:39:38+5:30
Prashant Koratkar Police Custody: जुना राजवाडा पोलीस ठाण्यासह कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुलाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

प्रशांत कोरटकरची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी, संतप्त शिवप्रेमींना चकवा देत न्यायालयात केले हजर
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. तेलंगातून ताब्यात घेतल्यानंतर कोरटकरला घेऊन पोलिसांचे पथक आज, मंगळवारी सकाळी कोल्हापुरात पोचले. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता २८ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाने काल, सोमवारी दुपारी तेलंगणातून अटक केली. रात्रभर प्रवास करून आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास पोलिसांचे पथक कोल्हापुरात पोहोचले. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासह कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुलाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
वाचा - महिनाभर गुंगारा देणारा शिवद्रोही जाळ्यात कसा अडकला?
संतप्त शिवसैनिकांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवून खबरदारी घेतली होती. पोलिसांनी सर्वांनाच चकवा देत लपून छपून कोरटकरला न्यायालयात हजर केले.
कोरटकरला न्यायालयात हजर करण्याआधीच शिवप्रेमींनी आक्रमक होऊन कोल्हापुरी चप्पल अन् चिल्लर उधळून निषेध केला. तसेच काही शिवप्रेमींनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या शिवप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले.