प्रशांतने मृत्यूनंतरही दिले चौघांना जीवनदान; हृदय, फुफुस, किडन्या केल्या दान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 05:13 PM2022-06-25T17:13:51+5:302022-06-25T17:14:09+5:30
प्रशांतला ब्रेन स्ट्रोक आला. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण २३ जूनला त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.
मुरगूड : मुरगूड ता. कागल येथील तरुण पण सद्या जयपूरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या प्रशांत राजेंद्र शिंदे (वय ३७) या तरुणाने मृत्यू नंतरही चार जणांना जीवनदान मिळवून दिले आहे. प्रशांतच्या ब्रेन डेड नंतर त्याच्या अवयवांचे दान करण्यात आले. प्रशांतच्या हृदय हे जयपूर मधील एका महिलेवर प्रत्यारोपण करण्यात आले आहे. शिवाय दोन्ही किडन्या, फुफुस ही अन्य रुग्णासाठी दिल्याने चार जणांना जीवनदान मिळाले आहे. यामुळे शिंदे कुटुंबियाचे कौतुक होत आहे.
सामान्य परीस्थितीत जन्मलेला प्रशांत हा जयपूर येथील एल.अँड.टी या कंपनीत इंजिनिअर म्हणून सेवेत होता. त्याची पत्नी दोन मुली आणि तो जयपूरला होते. तर आई, वडील, भाऊ मुरगूड येथे राहत आहेत. १८ जूनला प्रशांतला ब्रेन स्ट्रोक आला. त्यावेळी तेथील खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण २३ जूनला त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.
यावेळी तेथील डॉक्टरांनी प्रशांतचे वडील राजेंद्र शिंदे व पत्नी नयना शिंदे यांना अवयव दानाविषयी विचारले. प्रशांतने ही आपल्या पत्नी जवळ व कंपनीतील मित्राजवळ अवयव दानाविषयी चर्चा केली होती. आपला अकाली मृत्यू झाला तर आपल्या अवयवांचे दान करावे अशी इच्छा त्यांने व्यक्त केली होती. त्यामुळे तात्काळ दोघांनी ही अवयव दानास होकार दर्शवला. त्यानंतर रुग्णालयात सर्व तयारी केली. त्यानुसार प्रशांत च्या दोन्ही किडन्या, हृदय, आणि फुफुस यांचे वेगवेगळ्या चार रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले.
या निर्णयामुळे अवयव मिळण्यासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या चार रुग्णांना जीवनदान मिळाले. रुग्णालय प्रशासनाने २४ जूनला प्रशांतचा मृतदेह कुटूंबियाच्या ताब्यात देताना रुग्णालय आवारातून अंत्ययात्रा काढली आणि कुटुंबियांचे आभार मानले. त्यानंतर पुण्यापर्यंत विमानाने आणि तेथून मोटारीने आज, शनिवारी पहाटे त्याचा मृतदेह मुरगूड गावी आणण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रशांतच्या स्मृती चिरंतन
प्रशांतचे वडील राजेंद्र शिंदे यावेळी बोलताना म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीतुन प्रशांत आज चांगल्या कंपनीत नोकरीस होता. अचानक दुःख कोसळले पण त्याने अगोदर मित्र व त्याच्या पत्नी जवळ अवयव दानाची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे आपण सर्वांनी हा निर्णय घेतला. आमचा मुलगा कायमचा आमच्यापासून दूर गेला पण त्याच्या अवयवाच्या रूपाने आठवणी मात्र चिरंतन राहतील.